कोल्हापूर : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. इंदोरीकर महाराजांना वेळेत पोहोचणं शक्य नसल्याने कार्यक्रम रद्द केल्याचं आयोजकांनी सांगितलं. तसंच कोणत्याही संघटनेच्या दबावाला बळी पडलो नसल्याचाही दावा त्यांनी केला. याशिवाय तीन महिन्यानंतर पुन्हा विद्यापीठच्या बाहेर कार्यक्रम घेणार असल्याचं आयोजकांनी म्हटलं.


कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. याला कोल्हापुरातील पुरोगामी संघटनांनी विरोध केला होता. इंदोरीकर महाराजांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा पुरोगामी संघटनांनी दिला होता. स्त्रियांचा अपमान करणाऱ्यांचा कार्यक्रम विद्यापीठात, नको अशी भूमिका अंनिस आणि पुरोगामी संघटनांनी घेतली होती.तर, दुसरीकडे कार्यक्रम घेणारच अशी भूमिका कोल्हापूर युवा सेनेनी घेतलीय. परिणामी पुरोगामी संघटना आणि कोल्हापूर युवा सेना आता आमने-सामने आल्या होत्या. त्यानंतर काही तासातच इंदोरीकर महाजारांचा कार्यक्रम रद्द केल्याचं आयोजिकांनी सांगितलं.


शिवाजी विद्यापीठातील इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला विरोध


इंदोरीकर महाराज वादात
गेल्या काही दिवसांपासून आपल्या एका वक्तव्यावरुन कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर वादात आहेत. ओझर इथे आपल्या कीर्तनात 'स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. या प्रकरणी अहमदनगरच्या PCPNDT समितीने त्यांना नोटीस पाठवली होते. वादानंतर त्यांनी पत्रक जारी करुन दिलगिरीही व्यक्त केली होती.


निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराज काय बोलले?
'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टायमिंग हुकला की क्वॉलिटी खराब. पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.'


वादग्रस्त वक्तव्यानंतर इंदोरीकर महाराज यांची अखेर दिलगिरी


इंदोरीकर महाराजांचं वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलम 22 चे उल्लंघन असल्याचं समितीच्या सदस्याने म्हटलं आहे. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. इतकंच नाही तर या नोटीसनंतर जर पुरावे मिळाले तर इंदोरीकर महाराजांवर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे.


Indurikar Maharaj | इंदोरीकरांच्या कोल्हापुरातील कार्यक्रमाला अंनिस आणि पुरोगामी संघटनांचा विरोध