अकोला : तरुणांसह शेतकऱ्यांच्या पोरांना प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी (Indurikar Maharaj) एक तळमळीचं आवाहन केलं आहे. पोरांनो, मोर्चे आणि दंगलीच्या भानगडीत पडू नका, तुमचा वापर फक्त 'यूज आणि थ्रो'साठी होतोय असं इंदुरीकर महाराज म्हणाले. आज प्रत्येक कामामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे, अशा दंगलीत तुम्ही दिसला तर त्यासाठी 10 वर्षांची शिक्षा आहे असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.

Continues below advertisement

बारावी आणि दहावीची परीक्षा तोंडावर आल्या आहेत. मुले काहीच अभ्यास करेनात. राज्यातील सर्व शाळांत परीक्षा काळात मोबाईलवर बंदी घालावी अशी मागणी इंदुरीकर महाराजांनी केली आहे. मी दीड वर्षे शेती करून पाहिली, काहीही खरं नाही. इतर काहीही करा, पण भाजी आणि किराणा वरच्यावर भरता येईल असं काहीतरी करा असं आवाहन इंदुरीकर महाराजांनी केलं.

आजकाल शाळेतली पोरं रम्मी खेळून भिकारी झाले आहेत. पोरं अभ्यास करणारे नाही. अभ्यास हा विषय त्यांनी सोडून दिला. परीक्षा आली की खिडकीतून चिठ्ठी येते अशा शब्दात इंदुरीकर महाराजांनी टीका केली. 

Continues below advertisement

Indurikar Maharaj Akola : तुमचा वापर यूज अँड थ्रो

आजकाल पेनमध्ये कॅमेरे आहेत. टपरी पेटवाताना किंवा दंगलीत तुम्ही कुठे दिसले तर, 10 वर्षांची शिक्षा आहे. कारण, आतापर्यत दंगलीमध्ये गरिबांची पोरं आत गेली आहेत, मोठ्या श्रीमंतांची पोरं नाहीत आणि ते कधी जाऊ देणारही नाहीत. ते तुमचा वापर फक्त 'युज अँड थ्रो' म्हणून करणार, असेही कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी ठणकावून सांगितलं आहे. आज कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. म्हणून सर्व पोरांच्या पाया पडतो, दंगलीच्या भानगडीत पडू नका, असंही इंदुरीकर महाराजांनी म्हटलंय. 

Indurikar Maharaj Kirtan : मुली दरिद्री मुलांच्या मागे

इंदुरीकर महाराज म्हणाले की, "मुलगी हुशार मुलावर कधीही प्रेम करत नाही, ती कधीही चांगल्या मुलाच्या नादी लागत नाही. मुलगी ही दरिद्री मुलाच्याच नादाला लागते, त्याच्यावरच प्रेम व्यक्त करते. विहिरीवरच्या मोटारी चोरणारे, गाड्यांचे पार्ट चोरतो अशा मुलांच्या मागे मुली लागतात. एखादी मुलगी दरिद्री मुलाबरोबर पळून गेली तर ती आयुष्यात कधीही सुखी होत नाही. तिने सुखी असल्याचं सांगावं, मी तिच्या घरी सहा महिने भांडी घासतो. जिने आई-बापाची मान खाली केली ती मुलगी आयुष्यात कधीही सुखी होत नाही."

मी काहीही केलं तर लोक शिव्या देतात, मी फक्त सत्य बोलतो तरी लोक टीका करतात असं इंदुरीकर महाराज म्हणाले. 31 वर्षे आयुष्य लोकांच्या शिव्या खाण्यात गेलंय, मग थोड्यासाठी कशाला बंद करायचं असं म्हणत यापुढेही आपण कीर्तन सुरू ठेवणार असल्याचं इंदुरीकर महाराजांनी म्हटलंय.