Pune Indrayani River Bridge Collapses : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याची (Indrayani River Bridge Collapses) धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 20 ते 25 पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये 4 ते 5 पर्यंटकांचा मृत्यू झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना असे सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत.
सुप्रिया सुळे नेमक्या काय म्हणाल्या?
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे सुळे म्हणाल्या. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे.
आपत्ती व्यवस्थानमंत्री गिरीश महाजन
एनडीआरफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. बचावकार्य तातडीने सुरु करण्यात आले आहे. मी देखील घटास्थळी पोहोचत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थानमंत्री गिरीश महाजान गिरीश महाजन यांनी दिली आहे. मी घटनास्ळी गेल्यावर मला सविस्तर माहिती मिळेल असे महाजन म्हणाले. पाऊस पडला की सगळे लोक फिरायला जातात. पण जाताना काळजी घेणं गरजेचं आहे, असे महाजन म्हणाले. अशा घटना दरवर्षी घडतात, पण पर्यटकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचे महाजन म्हणाले.
बचावकार्य सुरु, 2 जणांचा मृत्यू झाल्याची आमदार सुनिल शेळकेंची माहिती
पादचारी पूल होता. शेतकऱ्यांना ये - जा करण्यासाठी हा पूल तयार करण्यात आल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरु केल्याने चार ते पाच पर्यटकांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती सुनिल शेळके यांनी दिली आहे. या दुर्घटनेते 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुनिल शेळके यांनी दिली आहे.