सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज  सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय नौदल दिनानिमित्ताने तारकर्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदाजे 3.40 वाजण्याच्या सुमारास चिपी विमानतळावर दाखल होणार आहेत. त्यानंतर ते राजकोट किल्ल्याकडे रवाना होतील. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ते अनावरण करतील. त्याशिवाय पंतप्रधान सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत, तिथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.


पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर नरेंद्र मोदी तारकर्ली इथं नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या प्रात्यक्षिकांना हजर राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. यावेळी नौदलाकडून नौदल दिनाच्या निमित्ताने प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे. 


पंतप्रधानांचा दौरा, बाजारपेठा बंद राहणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या निमित्त मालवण तारकर्लीतल्या बाजारपेठ बंद राहणार आहेत. त्याशिवाय, पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावर वाहतूक प्रतिबंध असणार आहेत. त्याशिवाय स्थानिकांच्या रहदारीवर निर्बंध असणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पंतप्रधान मोदी हे सिंधुदुर्गात असतील. स्वच्छता, सुभोभिकरण यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.


भारतीय नौदल दिनाचा इतिहास काय?


भारतीय सेनेच्या एअरस्पेसवर 3 डिसेंबर 1971 च्या दिवशी पाकिस्तानने हल्ला केला होता. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतरच 1971 सालच्या युद्धाला सुरुवात झाली.  पाकिस्तानच्या या आगळीकतेला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय नौदलानं ऑपरेशन त्रिशूल (ट्रायडन्ट) सुरु केलं. ऑपरेशनच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या नौदल मुख्यालय असलेल्या कराची तळाला लक्ष्य करण्यात आलं. भारतीय नौदलानं 4 डिसेंबरच्या रात्री कराची बंदरावर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक लष्करी विमानांचं नुकसान झाले. त्यामुळे पाकिस्तानची भारतावर बॉम्ब वर्षाव करण्याची क्षमता कमी झाली. त्यात भारताच्या नौदलाच्यावतीनं पहिल्यांदाच अॅन्टी शीप मिसाईलचा वापर करण्यात आला होता. भारतीय नौदलाच्या या प्रखर हल्ल्यात पाकिस्तानच्या नौदलाचं आणि कराची बंदराचं अतोनात नुकसान झालं. यामध्ये पाकिस्तानचे कंबरडे मोडले.