Akola News अकोला : सध्या नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे अख्या शिक्षण व्यवस्थेविषयी नकारात्मक भावना आहेत. शिवराज मोटेगावकरमुळे तर शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना जणू आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलं आहे. या परिस्थितीत प्रत्येकाला प्रेरणा देणारी सकारात्मक बातमी आहे अकोल्याच्या (Akola News) शिक्षण क्षेत्रातून. या बातमीने शिक्षण क्षेत्रासाठी दातृत्वाचा नवा आदर्श घालून दिला आहे. अकोला शहरातील्या शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या 'पाध्ये एज्युकेशनचछ संचालक मुकुंद पाध्ये यांनी भारतीय लष्कराच्या सेंट्रल वेल्फेअर फंडासाठी (Indian Army Central Welfare Fund) तब्बल एक कोटी रुपयांची देणगी देत देशसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
Akola News : बालपणीच्या गरिबीने संवेदनेची पेरणी
मुकुंद पाध्ये यांनी अत्यंत संघर्षमय परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अकोल्यात अगदी एज्युकेशन या शिकवणी वर्गाची सुरुवात केली. त्यांच्या माध्यमातून आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनियर झाले आहेत. देशभरातून विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला येतात. प्रामाणिकपणा, सातत्य सचोटी आणि दर्जा या माध्यमातून एक समाजशील शिक्षक म्हणून त्यांची संपूर्ण विदर्भात ओळख आहे. देश संकटात असताना अनेकदा त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून देशासाठी आपला सहभाग नोंदवला आहे. त्यांचा हा कृतिशील आदर्शवाद वाद त्यांच्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
Akola News : कारगिल युद्धाच्या वेळीही घालून दिला होता राष्ट्रभक्तीचा आदर्श
विशेष म्हणजे, पाध्ये यांच्या मनात देशसेवेची भावना सुरुवातीपासूनच आहे. 1999 च्या कारगिल युद्धावेळी त्यांनी कोणताही विचार न करता आपल्या क्लासच्या एका बॅचची संपूर्ण फी, म्हणजेच एक लाख रुपये सैनिक कल्याणासाठी अर्पण केले होते. त्या काळात एका शिक्षकाने केलेली ही मदत राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. आता तब्बल 26 वर्षानंतर त्याच भावनेतून त्यांनी शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी भारतीय मुकुंद पाध्ये यांनी भारतीय लष्कराच्या सेंट्रल वेल्फेअर फंडासाठी तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी दिली होती. हा निधी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे. लष्कराच्या 'सेंट्रल वेल्फेअर फंड'चे संचालक मेजर जनरल विशाल अगरवाल यांच्याकडे नुकताच त्यांनी हा धनादेश सुपूर्द केलाय. या उपक्रमात त्यांच्या कुटुंबातील आकाश आणि ओंकार पाध्ये यांनीही सहभाग नोंदवला आहे. अकोल्यातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या पाध्ये कुटुंबाच्या या देशभक्तिपूर्ण योगदानाची राज्यभर चर्चा होत आहे.
मातृभूमीचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न : प्रा. मुकुंद पाध्ये (Indian Army Central Welfare Fund)
या संदर्भात 'एबीपी माझा'ने प्राध्यापक मुकुंद पाध्ये यांच्याशी संपर्क केला. प्रा. मुकुंद पाध्ये हे सदैव माध्यमांपासून काहीसे दूर राहणारे. आपल्या सामाजिक उपक्रमांचा कोणताही गवगवा न करणारे. मात्र आम्ही त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता त्यांनी अत्यंत समर्पक प्रतिक्रिया दिली आहे. " माझी स्वतःही सैन्यात जात देश सेवा करण्याची इच्छा होती. मात्र, काही कारणांमुळे ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आजही मी स्वतःला देशाचा एक सैनिकच समजतो. त्यामुळेच आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. डोळ्यात तेल घालून देशाच्या सीमांचे संरक्षण करणारे सैनिक हेच खरे आपले 'सुपर हिरो' आहेत. त्यांच्यामुळेच आपण मोकळा श्वास घेतो आणि आनंदात राहू शकतो. सैनिकांचे त्याग बलिदान आणि योगदान याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. त्यांच्यामुळेच प्रत्येक भारतीय आज मोकळा श्वास घेऊ शकतो. सैनिकांच्या बलिदानावरच आजचा भारत उभा आहे. त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. मी देशासाठी काही करू शकलो, याचा आनंद कोणत्याही शब्दांच्या पार पलीकडचा आहे, त्यामुळे ही मदत नाही तर माझं कर्तव्य आहे"
इतर महत्वाच्या बातम्या
