income certificate : विशेष सहाय्य विभागाकडून निराधारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध स्वरुपातील योजनांचा लाभ घेणा-यांना उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत असून , दाखला मिळविण्याकरिता निराधारांची धडपड सुरु आहे. तलाठ्यामध्ये यामुळे गर्दी वाढल्याचे चित्र आहे.
संजय गांधी निराधार योजनेसह इतर विशेष अनुदान घेणा-या निराधार व्यक्ती , दिव्यांग , विधवांना आर्थिक लाभ मिळविण्यासाठी अर्जासोबत उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. निराधारांना पेन्शन योजनेचा अल्पसा असलेला आधारही एका दाखल्याअभावी नाहीसा होऊ शकतो. प्रत्येक वर्षी जूनपर्यंत निराधारांना उत्पन्नाचा दाखला जमा करणे बंधनकारक करण्यात आले असून , तो न दिल्यास शासनाकडून दिले जाणारे अर्थसहाय बंद केले जाणार आहे. त्यामुळे हा महत्वाचा दाखला जमा करण्यासाठी लाभार्थांची धडपड सुरु झाली आहे. पनवेल तालुक्यात ४ हजार ८९५ लाभार्थ्यांना हे अनुदान विविध योजनातंर्गत देण्यात येते. उत्पन्नाचा दाखला सादर न केलेल्या लाभार्थांच्या जुलैपासून अर्थसहाय्य बंद करावेत , असे आदेशही दिले आहेत. त्यामुळे ३० जून पर्यंत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
३० जूनची डेडलाईन - दरवर्षी निराधारांना एप्रिल ते जून या काळात लाभार्थ्यांना दाखला जमा करायचा असतो. आता या वर्षीचा दाखला जमा करण्यासाठी केवळ एक महिन्याची मुदत राहिली आहे. त्यानंतर आलेले दाखले स्विकारले जाणार नाहीत.
उत्पन्नाचा दाखला सादर कोठे करायचा ? - प्रशासनाकडून करण्यात आलेल्या अहवालानुसार योजनांतर्गंत पात्र लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला तहसिल कार्यालयात उपलब्ध असलेल्या संजय गांधी निराधार विभागात सादर करावे लागणार आहे.
कोणकोणत्या योजनांचा समावेश - संजय गांधी निराधार योजना , श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या योजनांचा समावेश आहे.