Nagarpanchayat Election : पालघर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडलं. यामध्ये विक्रमगड नगरपंचायतीमध्ये 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये जिजाऊ संघटना प्रणित विक्रमगड विकास आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, 14 जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. तर तलासरी नगरपंचायतीमध्ये 17 जागांसाठी 71 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत मध्ये बंद झाले आहे. मोखाडा नगरपंचायतमध्ये 17 जागांसाठी 63 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे.
आज होणार्या निकालानंतर या नगरपंचायतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहायला मिळेल. तलासरीमध्ये माकप, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगणार असून विक्रमगडमध्ये विक्रमगड विकास आघाडी, शिवसेना आणि भाजपा असा सामना रंगलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मोखाडामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशी रंगत आहे. विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा यांच्या मतदारसंघांमध्ये मोखाडा आणि विक्रमगड या दोन नगरपंचायती येत असून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर तलासरी नगरपंचायतमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले आणि शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या तिन्ही नगरपंचायती प्रतिष्ठेच्या ठरल्या असून नेमकी बाजी कोण मारत आज निकालानंतरच कळणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 93 नगरपंचायतींमधील 336 जागांसाठी मंगळवारी सरासरी 81 तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या 23 आणि त्या अंतर्गत पंचायत समितीच्या 45 जागांसाठी 73 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले होते. या सर्व जागांच्या निवडणुकींचा निकाल आज लागणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: