Cow Protection on Maharashtra: पुण्यात गोरक्षकांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी निषेध व्यक्त केला. गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये तोडपाण्याचा उद्योग सुरू असून महाराष्ट्र बिहारप्रमाणे होण्याच्या मार्गावर असल्याची टीका नायकवडी यांनी केली. त्यामुळे या गोरक्षकांच्या मुद्यावरुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या इद्रिस नायकवडी यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला. गोरक्षणाच्या नावावर समाज विघातक कृत्य करणाऱ्यांवर 'मोक्का'अंतर्गत कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी आमदार नायकवडी यांनी केली.
नाहीतर बिहारसारखी बदनामी महाराष्ट्राची होईल
राज्यात काही दिवसांपासून पशुधनाची वाहतूक करणाऱ्यांचा पाठलाग करून गोरक्षकांनी कायदा हातात घेतल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांना लुटण्याचा हा गोरक्षकांचा नवीन उद्योग राज्यात सुरू झाला आहे. अशा विकृत मनोवृत्तीच्या गोरक्षकांमुळे महाराष्ट्र बिहारसारखा होण्याच्या मार्गावर असून, येत्या अधिवेशनात हा विषय नक्की मांडणार असल्याचे नायकवडी यांनी सांगितले. शासनाचे अनुदान असल्यामुळे अनेक बनावट व बोगस गोशाळा सुरू असून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या गोरक्षकांच्या संघटित गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्यावर 'मोक्का' अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी आमदार नायकवडी यांनी केली. महाराष्ट्रात गोरक्षकांच्या नावाखाली कायदा हातात घेण्याचा प्रकार थांबवा, नाहीतर बिहारसारखी बदनामी महाराष्ट्राची होईल!" महाराष्ट्राला सांस्कृतिक वारसा आहे. पण, अशा घटनांमुळे तो धोक्यात येतोय. शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कठोर पावले उचलली पाहिजेत, असेही आमदार नायकवडी म्हणाले.
सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून हल्ला
दुसरीकडे, पुण्यात गोरक्षकांकडून आमदार सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्यात आली. पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेजवळ ही घटना घडली. पुण्यात फुरसुंगी येथे द्वारकादास गौशाळेत ठिकाणी आमदार सदाभाऊ खोत हे कार्यकर्त्यांसोबत गेले होते. त्यावेळी काही गौरक्षकांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, "राज्यामध्ये गोवंश कायद्याच्या आडोशाने शेतकरी दुधाळ जनावरं विकायला गेले तरी त्यांना मारहाण केली जाते, त्यांची जनावरे जबरदस्तीने नेली जातात. पोलीस स्टेशनला ही जनावरे गेल्यानंतर ती गोशाळेत नेली जातात. त्यानंतर दिवसाला 200 ते 500 रुपये आकारले जाते. याचा निकाल जर वर्षाने किंवा दीड वर्षाने लागला तर शेतकरी दंड भरू शकत नाही. त्यामुळे ती जनावरे तो माघारी नेत नाही. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील 10 म्हशी आणि त्याची 11 पाडसे ही पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेत आणण्यात आली होती. आज त्या म्हशी जाग्यावर आहेत की नाही हे पाहायला गेलो होतो. पण गोरक्षकांनी त्याला विरोध केला."
इतर महत्वाच्या बातम्या