अहमदनगर : राज्यात कोरोनाचं संकट असल्याने राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासाठी अद्यापही परवानगी दिलेली नाही. मात्र अहमदनगर जिल्ह्यातल्या आदर्श गाव हिवरे बाजार गावात 15 जून रोजी शाळा सुरू करण्यात आली आहे. हिवरे बाजार गाव कोरोना मुक्त झाल्यानंतर गावातील पालक आणि शिक्षकांनी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. त्यामुळे आता हिवरे बाजार या गावात शाळा देखील सुरू झाली आणि आज ही शाळा सुरू होऊन तब्बल 90 दिवस झाले आहेत.
अहमदनगरपासून अवघ्या काही अंतरावर असलेले हिवरेबाजार हे गाव. या गावाने आपल्या गावात केलेल्या विकासकामांच्या बळावर राज्यात नव्हे तर देशात आपला ठसा उमटवला आहे. अशाच या हिवरेबाजार गावाने आणखी एक आदर्श समोर ठेवला आहे. कोरोनामुळे राज्यात शाळा बंद असताना हिवरे बाजार गावात 15 जून रोजी चक्क शाळा सुरू करण्यात आली आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. मात्र हिवरेबाजार कोरोनामुक्त झाल्याने गावातील पालकांनी शाळा सुरू करण्याची विनंती गावचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांना केली. गावातील शिक्षक आणि पालकांनी ग्रामसभेत शाळा सुरू करण्याची विनंती केली आणि ग्रामसभेत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकांनी स्वतःच्या जबाबदारीवर मुलांना शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामुळे हिवरे बाजार गावात सुरुवातील शाळा सुरू करण्यात आले.
शाळेत सर्व वर्ग सॅनिटाईज करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शाळा सुरू करण्यात आली आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्याने ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले जात होते. मात्र याला विद्यार्थी देखील कंटाळले होते. त्यामुळे शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील चांगलाच उत्साह वाढला आहे. पुन्हा शाळेत मित्रांसोबत शिकायला मिळाल्याने विद्यार्थ्यांनी देखील आनंद व्यक्त केला.
हिवरे बाजार गावात शाळा सुरू होऊन तब्बल 90 दिवस झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि येणारी तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असताना हिवरे बाजाराने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच आता ज्याप्रमाणे हिवरे बाजारमध्ये शाळा सुरू झाल्या त्याप्रमाणे संपूर्ण राज्यत देखील शाळा सुरू व्हाव्यात अशी प्रार्थना विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाकडे केली आहे.