धाराशिव : जिल्ह्यात महापूर आला असताना, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यातील आसवं थांबत नसताना धाराशिवमध्ये एक IAS अधिकारी कसा असावा याचं प्रत्यंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष (Mainak Ghosh IAS) यांनी दिलं. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मैनक घोष हे पूरग्रस्तांच्या मदतीला धावले. मैनक घोष यांच्या याच कार्याचे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मुळचे पश्चिम बंगालचे असलेल्या मैनक घोष यांची नियुक्ती धाराशिवचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर झाली. त्यांच्यासोबत त्यांचे वडील माणिकराव घोषही धाराशिवमध्ये वास्तव्याला होते. माणिकराव घोषयांचे 27 सप्टेंबर रोजी निधन झालं.
Mainak Ghosh IAS : वडिलांवर अंत्यसंस्कार करून पूरग्रस्तांच्या मदतीला धावले
मैनक घोष यांच्या वडिलांवर धाराशविच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. 27 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी धाराशिवला महापुराने वेढा घातला. त्यामुळे मैनक घोष यांनी त्यांच्या वडिलांचे सोलापूर येथील विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार केले आणि लागोलाग कामाला लागले.
वडिलांच्या मृत्यूनंतर, अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मैनक घोष यांनी तुळजापुरातील पूर परिस्थिती पाहणी केली. आपले वैयक्तिक दुःख विसरुन ते पूरग्रस्तांच्या मदतीला धावले. पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासंबंधी त्यांनी निर्देश दिले.
Omraje Nimbalkar : लोकांच्या मदतीसाठी खासदार पुराच्या पाण्यात
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आपापल्या परीने पूरग्रस्तांची मदत करत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकरांनी तर जीवाची पर्वा न करता, पुराच्या पाण्यात उतरून एनडीआरएफ जवानांच्या खांद्याला खांदा लावून काम सुरू केलं.
Dharashiv Flood : भ्रष्ट अधिकाऱ्यांची भाऊगर्दी, पण मैनक घोष त्यापासून वेगळे
पण सगळेच अधिकारी काही सारखे नसतात. प्रशासनात काम करत असताना अनेक अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झाल्याचं दिसून येतंय. गरिबांची आसवं पुसण्याऐवजी त्यांचे शोषण करून काही चिरीमिरी हाती लागते का यासाठी हातपाय मारणारे अधिकारी आहेत. एवढंच नाही तर मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे अधिकारी अशा आपत्ती किंवा संकटाचे सोने करतात आणि पैसाही कमावताना दिसतात.
या अशा अधिकाऱ्यांच्या भाऊगर्दीत आपण यांच्यापासून वेगळे आहोत, समाजाप्रति असलेली संवेदना बाळगून आहोत याची प्रचिती देणारे, तसे कृत्यातून दाखवणारे अधिकारीही कमी नाहीत हेदेखील खरे.
वडील सोडून गेले असतानाही, अधिकारी म्हणून असलेल्या जबाबदारीचे जाणीव न विसरता काम करणाऱ्या, पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या मैनक घोष यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ही बातमी वाचा: