गडचिरोली : तलावात बुडवून पतीने पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना गडचिरोलीत घडली आहे. हत्येच्या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळावरच पतीला चोप दिला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.


उत्तरप्रदेशातील आग्रा येथील रहिवासी असलेल्या हंसराज राजपूत याचं गडचिरोलीतल्या अश्विनी उर्फ गंगाबाईसोबत पाच-सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. हंसराज हा गडचिरोलीच्या गॅस एजन्सीत काम करायचा तर गंगाबाई मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या.

या दाम्पत्याला 6 वर्षीय सलोनी आणि 4 वर्षीय दुर्गा अशा दोन मुली होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून हंसराज दारुच्या आहारी गेला होता. दारुच्या नशेत हंसराज मुलींना व पत्नीला रोज मारहाण करायचा. त्यामुळे आनंदात सुरु असलेल्या कुटुंबात विघ्न आले.

गेल्या दोन दिवसांपासून हंसराज आणि गंगाबाई यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. आज सकाळी गंगाबाई गडचिरोली येथील तालावात कपडे धुण्यासाठी गेली असता, काही वेळातच हंसराज दारुच्या नशेत तलावाजवळ आला आणि गंगाबाईला मारहाण करून पाण्यात ढकलले.

तलावाचे पाणी खोल असल्याने गंगाबाईचा मृत्यू झाला. ही घटना आजूबाजूच्या नागरिकांना समजताच घटनास्थळी धाव घेतली आणि हंसराजला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी हंसराज याला अटक करून पुढील तपास करत आहेत.