गोंदिया : तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा गावात घरघुती वादातून पतीने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे पत्नी 8 महिन्यांची गर्भवती होती. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

पतीने कुऱ्हाडीने वार केल्यानंतर पत्नी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला.

तिरोडा तालुक्याच्या घाटकुरोडा गावात राहणाऱ्या वामनया 32 वर्षीय हटवार या तरुणाशी 27 वर्षीय रुपालीचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले. रुपालीला एक वर्षाची मुलगी असून ती 8 महिन्यांची पुन्हा गर्भवती होती. मात्र, पतीशी सतत होत असलेल्या भांडणामुळे रुपाली ही मागील काही दिवसांपासून आपल्या माहेरी राहत होती. प्रसुतीसाठी रहिवाशी प्रमाणपत्राची गरज पडल्याने आज सकाळी आपल्या सासरी म्हणजे घाटकुरोडा गावात आली होती.

आरोपी पती वामन हटवार यांनी रुपालीशी नेहमीप्रमाणे भांडण केले. मात्र, भांडण इतके विकोपाला गेले की वामनने घरातील कुऱ्हाड आणून रुपालीच्या डोक्यावर हाणली. रुपालीला गंभीर दुखापत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान रूपालीचा मृत्यू झाला.

तिरोडा पोलिसांनी आरोपी पती वामन हटवारला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे.