मुंबई : जूनमध्ये चांगला झालेला पाऊस जुलैमध्ये काहीसा गायब झाल्याचं चित्र आहे. कारण जुलै महिन्यात जवळपास अर्धा महाराष्ट्र कोरडा राहिला आहे.

या पावसाळ्यात जूनमधे चांगला पाऊस झाला. मात्र जुलै महिना तुलनेनं कोरडा गेला. जुलैमध्ये 355 पैकी तब्बल 223 तालुक्यात सरासरीच्या 75 टक्क्यापेक्षाही कमी पाऊस झाला.

मराठवाडा आणि विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 टक्के पाऊसही झाला नाही. सोलापूर जिल्ह्यात फक्त 14 टक्के तर परभणी जिल्ह्यात 29 टक्के पाऊस झाला.

आतापर्यंत राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 20 ते 40 टक्के कमी पाऊस झाला आहे.

जुलै महिन्यातील पावसाची आकडेवारी :

  • राज्यातील 29 तालुक्यात सरासरीच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

  • 94 तालुक्यात सरासरीच्या 25 ते 50 टक्के पाऊस झाला आहे.

  • 100 तालुक्यात सरासरीच्या 50 ते 75 टक्के पाऊस झाला आहे.

  • 76 तालुक्यात सरासरीच्या 75 ते 100 टक्के पाऊस झाला आहे.

  • 54 तालुक्यात सरासरीच्या 100 टक्के किंवा त्याहून अधिक पाऊस झाला आहे.


(सौज्यन्य : कृषी विभाग, महाराष्ट्र सरकार)

आतापर्यंत पडलेला पाऊस (1 जूनपासून ते 2 ऑगस्टपर्यंत ) :

  • कोकण : कोकण आणि गोव्यात सरासरी 1844.2 मिमी. पाऊस पडतो. प्रत्यक्षात आतापर्यंत 1945.7 मिमी म्हणजेच सरासरीच्या 6 टक्के जास्त पाऊस पडला.

  • मध्य महाराष्ट्र : मध्य महाराष्ट्रात या काळात सरासरी 395.3 मिमी. पाऊस पडतो. प्रत्यक्षात 474.5 मिमी म्हणजेच सरासरीपेक्षा 20 टक्के जास्त पाऊस पडला.

  • मराठवाडा : मराठवाड्यात सरासरी 336.3 मिमी. पाऊस पडतो. प्रत्यक्षात 265.1 मिमी म्हणजे सरासरीच्या 21 टक्के कमी पाऊस पडला.

  • विदर्भ : विदर्भात सरासरी 490.1 मिमी. पाऊस पडतो. प्रत्यक्षात 400 मिमी म्हणजेच सरासरीच्या 18 टक्के कमी पाऊस पडला.