बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातील विहिरीतून गेल्या चार ते पाच दिवसांपासून गरम पाणी निघत असल्याने गावासह परिसरात कुतूहल निर्माण झालं आहे. तर काही गावकरी याकडे जादूटोण्याच्या संशयाने बघत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबद्दल खुलासा करावा, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहे.


जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील अकोली गावातील भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी बेंबाळा नदीकाठावर असलेल्या विहिरीतून गेल्या 14 तारखेपासून अचानक गरम पाणी येत आहे. विशेष म्हणजे या विहिरी शेजारी 20 फुटांवर दुसरी विहीर आहे. त्यातून गरम पाणी येत नाही. गेल्या चार दिवसांपासून या विहिरीतून अतिशय गरम पाणी येत असल्याने गावातील व परिसरातील नागरिक ही विहीर बघण्यासाठी गर्दी करत आहेत. पाणी अतिशय गरम असून आपण अंघोळीसाठी वापरताना त्यात थंड पाणी घ्यावं लागतं, अस गावातील नागरिकांचा दावा आहे.




दरम्यान गावातील नागरिकांनी या विषयी माहिती प्रशासनाला दिली असता संग्रामपूर तहसीलदार यांनी आपल्या ताफ्यासह विहिरीची पाहणी केली , दोन्ही विहिरीचे नमुने प्रशासनाने भूजल शास्र प्रयोगशाळेत पाठवले असून त्याचा अहवाल आल्यावरच याबद्दल काही माहिती देऊ शकतो, असं तहसीलदार यांनी सांगितलं.


अलीकडेच म्हणजे 12 जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यात सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला होता आणि त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी या विहिरीतून गरम पाणी आल्याने त्या भूकंपाचा याच्याशी काही संबंध आहे का? यावरही विचार भूगर्भ शास्त्रज्ञ तपास करतीलच. पण या घटनेमुळे नागरिकांत कमालीचं कुतूहल निर्माण झालं आहे. तर काहींनी यात रासायनिक बदलाची शक्यात सुद्धा वर्तविली आहे.