अकोला : कोरोनाच्या संकटामुळे जवळपास दोन वर्षांनी आज धुळवड साजरी झालेली पाहायला मिळाली. राज्यातील विविध भागात विविध पद्धतीने धुळवड साजरी झाली. अकोले तालुक्यातील चींचवणे गावात देखील वेताळ बाबाची यात्रा भरवण्यात आली होती. यावेळी नवसाचा 140 किलोचा दगडी बजरंग गोटा खांद्यावर उचलून तरुणांनी मारूती मंदिराला तसेच होळीला प्रदक्षिणा घालत " बोल वेताळ बाबा की जय " म्हणत आपला नवस फेडला.
अकोले तालुक्यातील चिंचवणे गाव अतिदुर्गम भागातील असून कोरोना काळात दोन वर्षे येथील वेताळ बाबांची यात्रा भरली नव्हती. मात्र यावर्षी प्रादुर्भाव कमी झाल्याने गावातील तरुण आणि इतर ग्रामस्थांनी वेताळ बाबांची यात्रा धूमधडाक्यात भरवली. मारुती मंदिरासमोर प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत डिजे आणि पारंपरिक वाद्यांच्या निणादात लेझिम पथक आणि नृत्य सादर करत ग्रामस्थांनी मजामस्ती केली. परिसरातील जवळपास चाळीस गावचे ग्रामस्थ हा उत्सव पाहण्यासाठी उपस्थित होते.
अनोखा नवस
मारुती मंदिरासमोरील पटांगणात 140 किलोचा नवसाचा गोटा ठेवण्यात आला होता. प्रथम गावातील खेमा सोमा डगळे यांनी हा गोटा खांद्यावर उचलून मंदिराला पाच फेरे मारले आणि त्या पाठोपाठ 30 तरुणांनी हा गोटा उचलून आपला नवस फेडला. गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. गावात या दिवशी प्रत्येक घरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. गावात आलेल्या प्रत्येक पाहूण्याला पुरणपोळी खाल्ल्याशिवाय गावातून बाहेर पडू दिले जात नाही. या दिवशी अनेक चाकरमानी शहरातून गावात येतात. लग्नाच्या बोलणी देखील या यात्रेत होतात. गावात रात्र जागवली जाते. गोटा उचलण्याचा कार्यक्रम संपल्यावर देवाची काठी निघते मंदिराभोवती काठी मिरवणूक काढली जाते. हा कार्यक्रम जवळपास पाच तास चालतो. पारंपरिक वाद्य, पारंपरिक नृत्य, डीजे गाणी गुलालाची उधळण करत आदिवासी बांधव देहभान विसरून नाचतात. हा संपूर्ण उत्सव पाहण्याजोगा असतो.
हे ही वाचा-
- Holi 2022 : होळी रे होळी!!! होळीच्या सेलिब्रेशनला कोळीवाड्यांमध्ये उधाण
- Konkan Shimga Utsav : कोकणात शिमगोत्सवाचा न्यारा रंग! उत्साह अन् जल्लोषात सण साजरा
- Holi 2022 : तळकोकणातील आगळावेगळा शिमगोत्सव; सांगेलीत ग्रामदैवत म्हणून फणसाच्या झाडाचं पूजन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha