हिंगोली :वीज बिलामध्ये (Light bill) पारदर्शकता यावी, वाढीव बिलांचा त्रास दूर व्हावा, यासाठी महावितरणकडून जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसवण्यात आले. मात्र, स्मार्ट मीटर बसल्यानंतरही ग्राहकांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्मार्ट मीटर (Smart meter) नागरिकांच्या सोयीसाठी, हितासाठीच असल्याचे म्हटले होते. मात्र, नागरिकांना स्मार्ट झटका बसताना दिसून येत आहे. हिंगोली (Hingoli) शहरातील एका रोजंदारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला चक्क दोन महिन्यांचं वीज बिल तब्बल 2 लाख 18 हजार  रुपये आलं आहे. एवढंच नाही तर बिल न भरल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या घराचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर भागात राहणाऱ्या प्रभावती श्रावणे यांचं  तीन खोल्यांचं अगदी साधारण घर आहे. घरात तीन लाईट, दोन पंखे आणि एक टीव्ही... एवढाच त्यांचा वीज वापर आहे. मात्र, या अल्प वीज वापरासाठी महावितरणकडून त्यांना तब्बल 2 लाख 18 हजार रुपयांचं वीज बिल देण्यात आलं. रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या प्रभावती श्रावणे यांच्या हातात जेव्हा दोन लाखांचं बिल आलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आयुष्यात दोन लाख रुपये एकत्र पाहिले नाहीत, तेवढे पैसे आता वीज बिलासाठी कुठून आणायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला. वीज बिल भरता न आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडितकरण्यात आला आहे. त्यामुळे कुटुंबाला अंधारात दिवस काढण्याची वेळ आली आहे. दरम्यान, महावितरणकडून या बिलामध्ये सवलत देण्यात आली असून, एक लाख 32 हजार रुपये भरावेत असं सांगण्यात आल्याचा दावा प्रभावती श्रावणे यांनी केला आहे. मात्र रोजंदारीवर कुटुंब चालवणाऱ्या या महिलेपुढे आता एक लाख 32 हजार रुपये भरायचे तरी कुठून? हा मोठा प्रश्न आहे.

स्मार्ट मीटरमुळे वीज बिलामध्ये पारदर्शकता येईल आणि ग्राहकांना वाढीव बिलांचा त्रास होणार नाही, असा दावा महावितरणकडून करण्यात आला होता. सिद्धार्थनगरमधील या घटनेमुळे स्मार्ट मीटर बसवल्यानंतरही बिलांचा गोंधळ कायम आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. महावितरणच्या या कारभारामुळे सर्वसामान्य ग्राहकाला मात्र स्मार्ट मीटरचा स्मार्ट शॉक बसताना दिसून येत आहे.

Continues below advertisement

स्मार्टमीटर विरोधात मोर्चा, नेतेही सहभागी

हिंगोलीमध्ये आज वीज ग्राहक संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महावितरणकडून स्मार्ट मीटरची सक्ती केली जात आहे, ती सक्ती बंद करावी यासह जुने मीटर कायम ठेवण्यात यावेत. तसेच, महावितरणकडून केली जाणारी अवाजवी बिल आकारणी स्थगित करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा हिंगोलीच्या महावितरण कार्यालयावर काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये हिंगोली शहरातले व्यापारी, त्याचबरोबर सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी सहभागी झाले होते. प्रतिकात्मक स्मार्ट मीटरला पुष्पहार घालून स्मार्ट मीटर सक्ती थांबविण्यासंदर्भात या आंदोलकांच्या वतीने मागणी करण्यात आली.