Pune Rain : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. दरम्यान, काल रात्रीपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुणे (Pune) शहरात पुन्हा हजेरी लावली आहे. पुणे शहरासाठी आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे.
आज दिवसभर पुणे शहरासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता
आज दिवसभर पुणे शहरासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 3 ते 4 तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत.
दौंडसह इंदापूर तालुक्यात तुफान पाऊस
इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे, मुसळधार पावसामुळे संपूर्ण भिगवण परिसर जलमय झाला आहे. विशेषतः पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रोडला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. भिगवण बस स्थानकात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भिगवणच्या थोरात नगर भागात रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही घरांमध्ये पाणी देखील शिरलं आहे. दरम्यान दुसरीकडे दौंडला देखील पावसानं झोडपलं आहे. दौंडमधील स्वामी चिंचोली गावाला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्क तुटला आहे. अनेक घरे पाण्याखाली बुडाली आहेत. बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा डावा कालव्याला पिंपळी लिमटेक या ठिकाणी भगदाड पडलं आहे. या कालव्याचे सर्व पाणी नागरिकांच्या शेतात आणि घरामध्ये शिरले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरूच होते, त्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कालव्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला यामुळे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती समोर आली आहे. कालव्याला पिंपळी लिमटेक भागात भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तातडीने नीरा डावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या: