गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने दोन राष्ट्रीय महामार्ग बाधित झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून मोठा विसर्ग वैनगंगा नदीत सोडला जाणार असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. दक्षिण गडचिरोलीत सिरोंचा येथे असलेल्या कालेश्वरम- मेडीगट्टा महाबंधाऱ्यातूनही गोदावरी नदीत मोठा विसर्ग सोडण्यात येतोय. या विसर्गामुळे जगदलपुर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. पुढच्या काही तासांसाठी नदी, नाले, ओढ्यांना येणाऱ्या पुरासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.


गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने दोन राष्ट्रीय महामार्ग बाधित झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून मोठा विसर्ग वैनगंगा नदीत सोडला जाणार असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दक्षिण गडचिरोलीत सिरोंचा येथे तेलंगणा सीमेवर असलेल्या कालेश्वरम-मेडीगट्टा महाबंधाऱ्यातूनही गोदावरी नदीत मोठा विसर्ग सोडला जात आहे. या विसर्गामुळे जगदलपुर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. सोमनपल्ली येथे नाल्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली-चामोर्शी रस्त्यावर गोविंदपूर येथे पूल बांधकामस्थळी पर्यायी मार्ग वाहून गेल्याने या हंगामात पुन्हा एकदा मार्ग बंद झाला आहे. पुढच्या काही तासांसाठी नदी, नाले, ओढ्यांना येणाऱ्या पुरासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 


गडचिरोली जिल्ह्यात वाहणाऱ्या विविध नद्या/उपनद्या तसेच या नद्यांमध्ये नजीकच्या जिल्ह्यातील नद्या/धरणे मधून वेळोवेळी सोडणारे पाणी/विसर्ग यामुळे जिल्ह्यात वाहणाऱ्या नद्या/नाल्यांमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थितीवर उचित उपाययोजना करण्यासाठी संबंधित सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. सध्या गोदावरी नदी ही कालेश्वरम स्टेशन (राज्य तेलंगाणा) येथे इशारा पातळीच्या वर वाहत आहे व गोदावरी नदी ही सिरोंचा नजीकच्या कालेश्वरम येथून प्रवेश करुन पुढे दक्षिण भागात सोमनूर येथे इंद्रावती नदीस मिळते. सध्या नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता गोदावरी नदीकिनारी गावांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


मेडीगड्डा बॅरेज, ता. सिरोंचा मधून वेळोवेळी सोडण्यात येणारे विसर्गामुळे (सद्यस्थितीत 11.50 लक्ष क्युसेक्स) खालील भागातील गावांमध्ये विशेषत: कोतापल्ली, नदीकुंठा, चिंतरेवला, अंकिसा, आसरअल्ली, सुंकरअल्ली, मुथुपुरम, मुकडीगटृटा, बोम्मेलकोंडा, सोमनूर इत्यादी गावांमध्ये विशेष दक्षता घेण्यात येत आहे. तहसीलदार सिरोंचा यांना या भागात वेळोवेळी अधिनस्त यंत्रणेमार्फत दवंडी देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यामुळे आणि वर्धा नदीतून येणाऱ्या अधिकच्या विसर्गामुळे सदर नदीची पाण्याची पातळी वाढत आहे. शिवाय गोसेखुर्द धरणातून सद्यस्थितीमध्ये 4113 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरु आहे. ज्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे.