Maharashtra weather News : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस (Rain) पडतोय, तर काही भागात पावसानं विश्रांती घेतलीय. दरम्यान, 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. 26 ते 30 ऑगस्ट यादरम्यान, पुन्हा उष्णतेचा पारा चढणार असल्याचे खुळे म्हणाले. तर 31 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.
उद्या 16 जिल्ह्यात पावसाची शक्यता
25 ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता कायम असल्याचे खुळे म्हणाले. विशेषतः शनिवार दिनांक 24 ऑगस्टला नाशिक नंदुरबार धुळे जळगांव पुणे सातारा कोल्हापूर मुंबई ठाणे रायगड अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या 16 जिल्ह्यात तर रविवारी दिनांक 25 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात दुपारनंतर गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. तर सोमवार दिनांक 26 ते शुक्रवार 30 ऑगस्ट दरम्यानच्या पाच दिवसादरम्यान कमाल तापमान वाढीबरोबर महाराष्ट्रात पुन्हा उन्हाचा पारा चढण्याची शक्यता जाणवते.
दरम्यान, राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, सध्या राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात कसा असेल पाऊस?
शनिवार दिनांक 31 ऑगस्ट ते गुरुवार दिनांक 5 सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहात महाराष्ट्रात पुन्हा मध्यम पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः संपूर्ण विदर्भ, खान्देश, नाशिक व मुंबईत अशा 16 जिल्ह्यात कदाचित एखाद्या-दुसऱ्या दिवशी तर जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नसल्याचे खुळे म्हणाले. सप्टेंबर महिना हा अधिक प्रकाशमान दिवसाचा व उष्णतेचा महिना असतो. मुंबईसह कोकणात 15, नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात 10 ते 12, तर उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात 5 ते 7 अशा सरासरी पावसाळी दिवसाचा हा महिना असतो. यावर्षी 1 ते 5, व 12 ते 16 आणि 25 ते 29 सप्टेंबर अशा प्रत्येकी पाच दिवसाच्या तीन आवर्तनातून महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात अंदाजे दहा ते बारा पावसाळी दिवसातून पावसाची तसेच धरणे ओसंडून नद्या खळखळण्याची व विहिरी व जमीन पाणीपातळीत वाढीची अपेक्षा असल्याचे खुळे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: