सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून सतत कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या नाल्याना पूरस्थिती निर्माण झाली आहे. सुख, शांती, गोठणा, निर्मला, तिलारी, भनसाळ, गडनदी, जाणवली नद्यांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाढच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यातून वाहणारी निर्मला नदीला पूर आल्याने आंबेरी पुलावर दिवसभर पाणी राहिल्याने तालुक्याशी 27 गावांचा संपर्क तुटला आहे. गेले तीन दिवस सतत आंबेरी पुलावरून पाणी वाहत असल्याने अत्यावश्यक सेवेत तसेच वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्याना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कणकवली शहरातील रामेश्वर प्लाझानजीकचे गटार तुंबले. त्यामुळे गटाराचे पाणी रामेश्वर प्लाझा इमारतीत गेले. कणकवली अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचलं होत.


मालवण धुवांधार कोसळलेल्या पावसामुळे मालवण तालुक्यातील जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. सखल भागात साचलेल्या पाण्याने घरांना वेढा दिला. खोदाई केलेल्या गटारात काही ठिकाणी नागरिकांनी कचऱ्याचे ढीग, झाडांच्या फांद्या तोडून टाकल्याने गटारे तुंबली होती. कचरा अडकून बंद झालेले प्रवाह सुरळीत करण्यात आले. मालवण तालुक्यातील भगवंतगड ते बांधिवडे पूल पाण्याखाली गेला आहे. मालवण ओझर नाका येथे रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे. मालवण घुमडे येथील घुमडाई मंदिरात पाणी घुसले आहे. तसेच संपूर्ण मंदिरास पाण्याने वेढा दिला आहे. मालवण मसुरे येथील मसुरकर, खोत जुवा बेटावर वस्तीत पाणी आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास पाणी घरात घुसण्याची भीती याठिकाच्या ग्रामस्थांना आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल आहे. मालवण कट्टा येथे सकल ठिकाणी बाजारपेठ पाणी साचलं.



ओरोस येथील जैतापकर कॉलनी परीसरात पाणी भरलं. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामामुळे अनेक ठीकाणी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे पाणी वस्तीत घूसण्याचे प्रकार घडत आहेत. देवगड तालुक्यातील वाडा या ठिकाणी सागरी महामार्ग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे विजयदुर्गला जाणारा मार्ग बंद झाला आहे. तीन तास हा मार्ग पूर्णपणे बंद होता. सागरी महामार्गावर पाणी आल्याने देवगड तालुक्याशी वाडा, विजयदुर्ग, गिर्ये, रामेश्वर या गावांचा तालुक्याची संपर्क तुटला होता. जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.


मालवण तालुक्यातील वेरळ गावातुन वाहनाऱ्या नदीने उग्र रूप धारण केले असून या गावातील सातेरी मंदिर तसेच काही घरे पाण्याखाली गेल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेरळ नमसवाडी येथे पाणी भरल्याने ग्रामस्थांचे हाल झाले आहेत. त्यांना घराबाहेर पडणे ही मुश्कील होऊन बसले आहे. या गावातील भात शेती पूर्णपणे पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


जिल्ह्यातील 13 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले


जिल्ह्यातील 13 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले तर देवगड तालुक्‍यातील कोर्ले-सातांडी हा मध्यम प्रकल्प सुद्धा 100 टक्के भरला आहे. जिल्ह्यातील एकमेव असलेल्या तिलारी आंतरराज्य या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा 69.34 टक्के भरला आहे. सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण आज ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे पालिकेच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष यांनी आपल्या सहका-यासमवेत त्याठिकाणी जाऊन जलपूजन केले. 18 मीटरची खोल आलेला हे धरण अनेक वर्षांनी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरलं.


आचरा कणकवली रस्त्यावर पिसेकामते येथे वडाचे झाड पडले असून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तर देविदास कृष्णा जाधव यांच्या कोलतेवाडी कसाल येथील घरामध्ये ओहोळाचे पाणी गेल्याने त्यांचे घरातील तिघांना गावातील लोकांच्या सहकार्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढलेले आहे. कुडाळ तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू करून या तिघांना बाहेर काढण्यात आले.


जिल्ह्यातील दोडामार्गमधील सर्वात मोठा आंतरराज्य प्रकल्प तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने धरणाच्या साठ्याच वेगाने वाढ होत आहे. धरणातील पाण्याची पातळी नियंत्रीत ठेवण्याच्या दृष्टीने धरणात येणारे अतिरिक्त पाणी नियंत्रित पद्धतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्यात येणार आहे. तसेच धरणाच्या परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे खरारी नाल्यातील पाणी नदी पात्रात येऊन नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. तरी ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आजपासून पुढील कालावधीत नदी पात्रातून ये जा करू नये, नदी पात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी. नदी काठच्या सर्वच गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन सहाय्यक अभियंता, तिलारी शिर्षकामे उपविभाग, कोनाळकट्टा यांनी केले आहे.


Monsoon In Maharshtra | तळकोकणात पावसाचा जोर वाढला; मालवण, देवगड, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस