Heat Wave: विदर्भात (Vidarbha) उन्हाचा चटका प्रचंड वाढला असून उष्णतेची लाट (Heat Wave) आणखी तीव्र झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून, विदर्भातील तीन जिल्ह्यांनी तापमानाची सर्वोच्च पातळी ओलांडली आहे. काल (18 मे) वर्धा येथे सर्वाधिक 46.5 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. या वाढत्या उष्णतेमुळे नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस (21 मे पर्यंत) उष्णतेच्या तीव्र लाटेचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा 45 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. अकोला आणि अमरावती पाठोपाठ आता वर्धा शहर देखील देशातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत हा पारा 47 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची भीती वर्तवली जात आहे. विदर्भात काल सर्वाधिक तापमान वर्धा येथे 46.5 अंश सेल्सिअस, अमरावती 46.4, अकोला 46.3, यवतमाळ 45.4 व नागपूर 44.4 नोंदविले गेले. बुलढाणा 43.6 अंश, चंद्रपूर 43.8 अंश, गडचिरोली 43.6, गोंदिया 43.8, नागपूर 44.4, वाशिममध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Heat Wave: हवामान खात्याचा नागरिकांना सल्ला
पुढील काही दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी दुपारी 12 ते 3 या वेळेत अत्यंत आवश्यक काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर पडताना हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत. शरीरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून ओआरएस (ORS), ताक, लिंबूपाणी, आणि भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Monsoon 2026: मान्सूनने अंदमान-निकोबार बेट व्यापले
दरम्यान, एकीकडे विदर्भ उन्हाने होरपळत असतानाच दुसरीकडे देशातील सर्वसामान्य आणि शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. वर्ष 2026 च्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी भारताकडे आपली वाटचाल कमालीची गतिमान केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी मोसमी वाऱ्यांनी आग्नेय अरबी समुद्र, कोमोरीन भाग आणि नैऋत्य-आग्नेय बंगालच्या उपसागराच्या अनेक भागांत यशस्वी प्रगती केली आहे.
मान्सूनने अंदमान समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सूनची ही प्रगती वेळेआधी आणि अत्यंत समाधानकारक मानली जात आहे. सध्या हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या 3-4 दिवसांत हे वारे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांत वेगाने पुढे सरकतील. अंदमानमध्ये मान्सून वेळेत दाखल झाल्यामुळे आता भारताच्या मुख्य भूमीवर म्हणजेच केरळमध्ये मान्सून कधी धडकणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
