मुंबई: आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने दिल्लीत आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच वसंत पंचमी निमित्त आज पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 


आज देशात 74 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह 


देशभरात आज 74 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 


असा आहे दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम 


- सकाळी 10.22 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्तव्यपथ येथे पोहचतील. सकाळी 10.25 वाजता उपराष्ट्रपती कर्तव्यपथ येथे पोहचतील.
- सकाळी 10.27 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि यावेळेचे प्रमुख पाहूणे इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसी कर्तव्यपथ येथे आगमन.
- राष्ट्रपती आणि प्रमुख पाहुण्यांचे पंतप्रधानांकडून स्वागत.
- संरक्षण मंत्री, संरक्षण राज्यमंत्री, चिफ ऑफ डिफेन्स, तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांचा पंतप्रधानांकडून परिचय.
- राष्ट्रपती, प्रमुख पाहुणे आणि पंतप्रधान व्यासपीठावर विराजमान होतील.
- त्यानंतर ध्वजारोहण होईल. त्यावेळी राष्ट्रपतींचे अंगरक्षक सलामी देतील. यावेळी बॅण्डवर राष्ट्रगीत आणि 21 तोफांची सलामी दिली जाईल.
- सकाळी 10.30 वाजता प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला सुरूवात होईल. संचलन साधारण दुपारी 12.05 वाजेपर्यंत चालेलं.
- विविध राज्यांचे सांस्कृतिक रथ, त्यानंतर दुचाकी स्टंट. 
- विमानांच्या कवायती आणि सलामी, यानंतर पाहुण्यांना सलामी दिली जाईल.
- राष्ट्रपती आणि प्रमुख पाहुणे मार्गस्थ होतील.


प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत शिवाजी पार्क येथे सकाळी 9 वाजता पोलीस परेड होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिसांचे इतर वरिष्ठ अधिकारी शिवाजी पार्क मैदानात उपस्थित राहणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरचंद पार्क मैदानावर शासकीय ध्वजारोहण होणार आहे.
 
उद्धव ठाकरे आज ठाण्यात


शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता ठाण्यात येणार आहेत. आनंद आश्रमात सेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनाही श्रद्धांजली अर्पण करतील. उद्धव ठाकरे शिवसेना आयोजित मेडिकल कॅम्पचं उद्घाटन करतील. त्यानंतर उद्धव ठाकरे जैन मंदिराला भेट देणार आहेत.
 
पंढरपूरात आज विठ्ठल रखुमाईचं लग्न


पंढरपुरात वसंत पंचमी निमित्त विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा आज संपन्न होणार आहे. सकाळी 9 वाजता रुक्मिणी स्वयंवर कथा सुरू होईल. साधारण दुपारी 12 वाजता देवाचा विवाह सोहळा सुरू होईल. या विवाहासाठी जालना येथील एक महिला भक्तांकडून विठ्ठल रुक्मिणींला जवळपास दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, विवाहाचा खास पोशाख आणि रुखवत अर्पण करतील. संध्याकाळी 5 वाजता हत्ती घोडे आणि विविध 20 प्रकारच्या पारंपरिक वाद्य पथकात विठ्ठल मंदिरातून शोभा यात्रा निघेल. त्यानंतर आकर्षक अशा शोभा यात्रेचे नियोजन मंदिर समितीकडून करण्यात आले असून ही शोभा यात्रा शहातून नगर प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा मंदिरात येईल.