Hari Narke Passed Away: ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे.  Asian Heart Hospital मध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी हरी नरके आजच पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते. येताना पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे बीकेसीच्या एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. 


हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि  शासकीय पातळीवर वेगाने  निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र  शासनाने समग्र महात्मा फुले हा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला, त्याचे संपादक हरी नरके होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने  26 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन  हरी नरके यांनी केले होते. 


पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते.  तसेच  भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील  होते. प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि  महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा या दोन पुस्तकांचा समावेश आहे.


ओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं


अजित पवारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवार म्हणाले,  प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतीशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ञ सदस्य म्हणून काम केलं आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू मांडणारं, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेलं बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं आहे. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी झाली आहे.


 एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज गमावला


मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले. हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे,  ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली.