Gudi Padwa 2024 Nagpur : मोदीजींच्या (PM Modi) नेतृत्वात नवा भारत आज जग पाहत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने भारतामध्ये परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाची गुढी आपण उभारणार आहोत. त्यासाठी आपण सर्वांनी विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मोदींच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहावे, असा संकल्प करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले आहे. आज नागपुरात गुढी पाडाव्यानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यंदाचा गुढीपाडवा हा खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्वाचा गुढीपाडवा आहे. कारण, आता पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्री राम आपल्या अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) विराजमान झाले आहेत. जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला त्यावेळी आपण दिवाळी साजरी केली आणि गुढीही उभारली. मात्र, त्यानंतर आमचे श्रीराम वर्षानुवर्ष या ठिकाणी अज्ञातवासात, वनवासात होते. मात्र, मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीराम आपल्या मूळ स्थानी अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) विराजमान झालेत. म्हणून आता खऱ्या अर्थाने सांस्कृतिक पुनर्जागणाच्या नवीन पर्वाला आज सुरुवात झाली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
सनातन हिंदू लोक आम्ही आहोत, हे सांगण्याची वेळ आलीय
सांस्कृतिक पुनर्जागणाच्या या नव्या पर्वात आता आपल्याला येणाऱ्या नवीन पिढीला आपला जाज्वल्य इतिहास, संस्कृति आणि समृद्ध अशी परंपरा सुपूर्द करायची आहे. त्यामध्ये मोगलांनी, इंग्रजांनी लिहिलेला इतिहास नाही तर जगाच्या पाठीवरचा सगळ्यात जुना आणि वैभवशाली इतिहास आपल्याला सांगायचा आहे. कधीकाळी इतिहास आणि संस्कृतीतून डिलीट केलेली पाने आता नव्याने लिहायची आहे. आम्ही कधीही पराजित मानसिकतेतले लोक नाहीत. तर वर्षानुवर्षे ज्यांनी जगाला मार्गदर्शन केले, अशा भारतीय संस्कृतीतील सनातन हिंदू लोक आम्ही आहोत, हे सांगण्याची वेळ आता आल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उपराजधानीत गुढीपाडव्याचा उत्साह
आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाची सुरुवात आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असून आजपासून सुरु होणाऱ्या वर्षाला क्रोधीनाम संवत्सर असं म्हटलं जातं. शालीवाहन शके 1946 ची सुरुवात आजपासून झालीय. आजच्या दिवशी घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. गाडी, सोनं यासारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केली जाते. दरम्यान गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभरात ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
गुडीपाडाव्याचा हाच उत्साह उपराजधानी नागपुरात देखील बघायला मिळतोय. नागपूरमध्ये सामुहिक रामरक्षा पठण आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही सहभाग घेत सर्वांना गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. तर या शोभायात्रेत अभिनेत्री प्राजक्त माळी या देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्राजक्ताने नागपुरकरांना मतदान करण्याचं आवाहन केलंय.
इतर महत्वाच्या बातम्या