हळदीच्या पूर्वसंध्येलाच नवरदेवाची गळफास घेऊन आत्महत्या
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 20 Apr 2019 11:40 AM (IST)
'मी आयुष्यात काहीही करु शकलो नाही, म्हणून मी जीवन संपवत आहे' असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना नवरदेवाच्या मृतदेहाजवळ आढळली
नाशिक : ऐन लग्नाच्या तोंडावर नवरदेवाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशकात समोर आली आहे. हळदीच्या आदल्या दिवशी निखिल देशमुख या नवरदेवाने आयुष्य संपवलं. निखिल देशमुखचा विवाह आज (शनिवार) नाशिक शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणीशी होणार होता. नाशकातील हिरावाडी परिसरात देशमुख कुटुंब वास्तव्यास होतं. सातपूर परिसरातील कंपनीत तो नोकरी करत होता. त्यामुळे कंपनीजवळ बळवंतनगरमधील एका फ्लॅटमध्ये निखिल राहत होता. गुरुवारी एकीकडे घरात लग्नाची जय्यत तयारी सुरु असताना फ्लॅटवर त्याने आपलं आयुष्य संपवलं. VIDEO | भाजपला शहीदांचा अपमान करणारे खासदार हवे आहेत का? | स्पेशल रिपोर्ट निखिलच्या मृतदेहाजवळ पोलिसांना चिठ्ठी लिहिलेली सापडली. 'मी आयुष्यात काहीही करु शकलो नाही, म्हणून मी जीवन संपवत आहे' असा मजकूर चिठ्ठीत लिहिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. निखिलच्या पश्चात आई, वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. निखिलने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.