उस्मानाबाद: लग्न म्हटलं की, नवरा नवरीच्या मनात हुरहूर, आनंद अन् गोड-गुलाबी स्वप्नं असतात. जसजशी लग्नघटिका जवळ येते तसतसं हा आनंद द्विगुणित होत जातो. पण आज उस्मानाबादमधील एका नवदाम्पत्यांना लग्नघटिका बाजूला सारुन थेट मोर्चाची वाट धरली...

 

कोपर्डीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी उस्मानाबादमध्ये मराठा समाजाच्या विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचवेळी एक जोडपं लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी थेट मोर्चात सहभागी झालं. मोर्चात आपला निषेध नोंदवल्यानंतर हे जोडपं लग्नस्थळी पोहचलं.

 

मोर्चात सहभागी होऊन या जोडप्यानं फक्त निषेधच व्यक्त केला नाही. तर आपल्या लग्नाचा खर्च वाचवून त्यातील काही रक्कम कोपर्डीतील पीडित मुलीच्या कुंटंबीयांना दिली. दरम्यान, नववधूही मोर्च्यात सामील झाली होती. 'आज मुलींना सहजपणे फिरता येत नाही तितकं मोकळं वातावरण राहिलेलं नाही.' असं म्हणत तिनं आपली खंत व्यक्त केली. 'या मूक मोर्च्याच्या माध्यमातून आम्ही आमच्या उपेक्षेकडे सरकारचं लक्ष वेधणाचा प्रयत्न केला आहे.' असं नवऱ्यामुलानं सांगितलं.

 

मराठा समाजाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिजाऊ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे या मोर्च्याला मराठा समाजातील प्रत्येक गटातल्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. कोपर्डीतल्या बलात्काराच्या दोषींना फाशी दिली जावी, अशी मागणी या मोर्चात करण्यात आली.

 

याआधीही औरंगाबादमध्येही अशाच विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चाचं आयोजन लक्षात घेता पोलिसांनी या भागात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एसआरपीएफच्या 2 तुकड्याही या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या.

 

VIDEO: