(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gram Panchayat Election : राज्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध; अर्ज मागे घेण्याची मुदत संपली
Gram Panchayat Election : राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. अर्ज माघार घेण्याची 7 डिसेंबरला मुदत संपली.
Gram Panchayat Election : राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat Election) 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 5 डिसेंबरपर्यंत अर्ज छाननी झाली असून अर्ज मागे घेण्याची मुदत देखील संपली आहे. त्यामुळे जवळपास राज्यभरातील ग्रामंचपायतींच्या निवडणुकांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
रायगडमध्ये 50 ग्रामपंचायती बिनविरोध
रायगड जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये महाडमधील 22, श्रीवर्धन 09, म्हसळा 07 आणि श्रीवर्धन येथील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता जिल्ह्यात सरपंच पदासाठी 531 तर सदस्यपदासाठी 3238 उमेदवार रिंगणात आहेत. रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीसाठी आता निवडणुका होणार आहेत.
गोपीनाथ गड असलेली बीडच्या परळी मधील पांगरी गावची ग्रामपंचायतीवर धनंजय मुंडेंचे वर्चस्व
गोपीनाथ गड असलेली परळी तालुक्यातल्या पांगरी गावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे. या ग्रामपंचायतीमधील 11 पैकी 10 जागा धनंजय मुंडे यांनी बिनविरोध आपल्या ताब्यात घेतल्या असून सुशीला कराड यांची सरपंच पदी वर्णी लागली आहे. बिनविरोध ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती बिनविरोध
कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर करवीर आणि हातकणंगले तालुक्यात जोरदार हालचाली झाल्या आहेत. चंदगड तालुक्यातील 40 पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातील सहा ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकलाय. सरपंच पदासाठी 93 तर सदस्य पदासाठी 601 उमेदवार रिंगणात आहेत.
सांगली जिल्ह्यातील 28 ग्रामपंचायती बिनविरोध
सांगली जिल्ह्यातील 447 ग्रामपंचायतींमधील 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील उपाळावी (मायणी), शाळगाव गावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे. यामुळे आता सांगली जिल्ह्यातील 419 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे.
सिंधुदुर्गमध्ये 44 ग्रामपंचायती बिनविरोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातील 30 ग्रामपंचायतींवर भाजपचे कमळ फुलले आहे. सावंतवाडी तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
20 डिसेंबरला मतमोजणी
9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली. निवडणूक आयोगाकडून अर्ज दाखल करण्यासाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर एवढा कालावधी देण्यात आला होता. तर 5 डिसेंबरपर्यंत अर्ज छाननी करण्यात येणार होती. अर्ज मागे घेण्याची तारीख 7 डिसेंबर होती. आता 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या