नागूपर/मुंबई: ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी द्या असे अर्ज सरकारकडे आले आहेत, मात्र सरकारने सध्या या अर्जावर कोणताही विचार केलेला नाही, असं स्पष्टीकरण उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. ते नागपुरात बोलत होते.


गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार वाईनशॉपचालकांना घरपोच मद्य पुरवठा करण्यास परवानगी देणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. त्याबाबत बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं.

बावनकुळे म्हणाले,  “काही नागरिकांचे अर्ज माझ्याकडे आले आहेत. वाईनशॉपमध्ये जी दारु घेतो, ती होम डिलिव्हरी करा. वाईन शॉप मालकाला तशी परवानगी द्या. असा एक अर्ज आला आहे. मात्र महाराष्ट्र सरकारचं तसं कोणतंही धोरण नाही. मध्यंतरी मुंबईतील काही वाईनचालकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून होम डिलिव्हरीसाठी बुकिंग सुरु केलं होतं. ते घरी जाऊन बॉटल पोहोचवायचे. पण तसं कोणतंही धोरण नाही. सध्या अर्ज आला असला, तरी अजूनही सरकारने त्याबाबत कोणताही विचार केलेला नाही, तशी पॉलिसी सरकारकडे तयारही झालेली नाही. फक्त एक अर्ज आला आहे, मात्र त्यावर सरकारने विचार केलेला नाही”.

 ऑनलाईन मद्याला परवानगीची मागणी

दरम्यान, काही दिवसांपासून ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देण्याची मागणी होत आहे. तसा अर्जही सरकारकडे करण्यात आला आहे. दारुच्या नशेत ड्रायव्हिंग केल्याने अनेक अपघात होतात, त्यामुळे मद्य होम डिलिव्हरी करण्याची परवानगी द्या, असं या अर्जात म्हटलं होतं.

मात्र आता राज्य सरकारने या अर्जावर कोणताही विचार केला नाही, असं उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.