Soybean Purchase Centre: गेल्या वर्षभरापासून सोयाबीन हमीभावावरून नाराज शेतकऱ्यांना आता खरेदी केंद्रांवरही अडचणीच असल्याचं समोर येतंय. बरदाना तुटवड्याने राज्यातील अनेक सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रच (Soybean)ठप्प असून शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र चालकांनाही ही खरेदी पूर्वपदावर कधी येणार याबाबत कल्पना नसल्याचे समोर आले आहे. सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र गेल्या 12 दिवसांपासून बंद असून राज्यभरातील अनेक खरेदी केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय.


राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ सोयाबीनची खरेदी करत आहेत. राज्यभरात 585 केंद्रांना सोयाबीन खरेदीची परवानगी असली तरी प्रत्यक्ष खरेदी मात्र केवळ 561 केंद्रांनी सुरू केली होती. त्यातही अडचणी असून प्रत्यक्ष खरेदी सुरू असलेल्या केंद्रांमध्ये बारदान्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने खरेदी केंद्रच बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे .


बारदाण्याचा तिढा, खरेदी केंद्र ठप्प


सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेली हमीभाव खरेदी केंद्र ठप्प झाली असून धाराशिवची शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र गेल्या बारा दिवसांपासून बंद असल्याची माहिती आहे. सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बारदाना (पोते) नसल्याने बंद असल्याचं सांगण्यात येत आहे. सोयाबीन खरेदी केंद्र बंद असल्याची केंद्र चालकांकडून खरेदी केंद्रांवर बॅनरबाजी सुरू आहे. खरेदी केंद्रच ठप्प असल्याने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेल्या 25% शेतकऱ्यांची खरेदी झाली नाही.


75 टक्के शेतकऱ्यांची खरेदी बाकी


सोयाबीन हमीभाव विक्रीसाठी 31 डिसेंबर पर्यंत राज्यातील 6 लाख 79 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे . मात्र प्रत्यक्षात सुमारे दीड लाख शेतकऱ्यांचीच खरेदी होऊ शकली . म्हणजेच नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी केवळ 25 टक्केच शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे . 75 टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन विकायचे आहे .


सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ


राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत सात दिवसांनी म्हणजेच 6 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. आता सोयाबीनच्या खरेदीसाठी 6 जानेवारीपर्यंत नोंदणी सुरू राहणार आहे. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत 12 जानेवारीपर्यंत केली जाणार आहे, अशी महिती देखील पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.


सोयाबीनची खरेदी 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू 


किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी 4 हजार 892 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू आहे. आतापर्यंत सोयाबीनची तीन लाख 34 हजार 331 मेट्रिक टन एव्हढी विक्रमी खरेदी झाली आहे. मागील वर्षी केवळ 7 हजार 400 क्विंटल एवढी खरेदी झाली होती. यावर्षी शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे. राज्यात सध्या 561 खरेदी केंद्र सुरू असून आतापर्यंत 6 लाख 69 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.


हेही वाचा:


शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास मुदतवाढ,  मंत्री जयकुमार रावलांची घोषणा