मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशभरात वाढतच आहे. गेल्या 50 दिवसांपासून देश लॉकडाऊन आहे. याचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने देशातील विविध देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असेलेलं सोनं ताब्यात घ्यावं आणि कोरोनाच्या संकटात देश उभा करण्यासाठी त्याचा वापर करावा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.


देशातील विविध देवस्थान ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर सोनं पडून आहे. हे सोनं सरकारने कर्जाने ताब्यात घ्यावे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या अंदाजानुसार देशात 1 ट्रिलियन डॉलर म्हणजे जवळपास 76 लाख कोटी रुपये इतकं सोने आहे. सरकारने हे सोने 1 किंवा 2 टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे आणि कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी याचा वापर करावा, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचवलं आहे.