मुंबई : औरंगाबादच्या नामांतरणामुळे वाद होऊन महाविकास आघाडी सरकार पडेल त्यामुळे या नामांतरणाच्या वादात या सरकारने पडू नये असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. औरंगाबादचा नामांतरण करायचं होतं तर पूर्वी सरकार होतं त्यावेळी का केलं नाही असा सवाल यावेळी रामदास आठवले यांनी उपस्थित केला. ते आज पालघरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


उद्धव ठाकरे हे सध्या मुख्यमंत्री आहेत. त्यांना शुभेच्छा मात्र ते पुढे किती दिवस मुख्यमंत्री राहतील हे सांगता येत नाही त्यामुळे हे सरकार पडून भाजप आणि रिपाइंच सरकार राज्यात बसेल , तसंच मुंबई महानगरपालिकेत यावेळी भाजप आणि रिपाइं सत्तेत येणार असून भाजपचा महापौर तर रिपाईचा उपमहापौर बसेल असा विश्‍वास यावेळी आठवले यांनी व्यक्त केला आहे. यूपीएच्या प्रमुख पदी शरद पवार नियुक्ती करण्याची मागणी सध्या केली जाते. मात्र काँग्रेसचा याला विरोध असल्याने ते शक्य  नसलं तरी आमच्या शरद पवारांना शुभेच्छा आहेत असं म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत ठिणगी टाकण्याचा आठवले यांनी यावेळी प्रयत्न केला.


केंद्र सरकारने तयार केलेल्या तीनही कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. शेतकरी आंदोलन करत असले तरी हे तीनही कायदे मागे घेणे शक्य नाही प्रत्येक कायद्याला विरोध होत असतो मात्र ते कायदे मागे घेतल्यास संविधान धोक्यात येईल असं मत दिल्लीत कृषी विधेयकं विरोधात सुरू असलेल्या कायद्यांवर आठवले यांनी व्यक्त केले. तर पालघरमध्ये प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदर यामुळे येथील स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याने स्थानिकांनी त्याला विरोध करू नये असं सांगत रामदास आठवले यांनी यावेळी वाढवण बंदराच समर्थन केलं.