सरकार शिवस्मारकाच्या पुतळ्याची रचना बदलण्याच्या विचारात
एबीपी माझा वेब टीम | 06 Feb 2019 10:36 AM (IST)
शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याऐवजी आता गुजरातमधील सरदार पटेलांसारखा उभा पुतळा बनवण्याचा विचार असल्याची माहिती मिळतेय.
मुंबई : शिवस्मारकाच्या पुतळ्याची रचना बदलण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याऐवजी आता गुजरातमधील सरदार पटेलांसारखा उभा पुतळा बनवण्याचा विचार असल्याची माहिती मिळतेय. याविषयी 27 नोव्हेंबर 2018 च्या शिवस्मारकाच्या तांत्रिक समितीच्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. यावेळी शिवस्मारक प्रकल्प सल्लागाराला 3-4 पर्याय सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सल्लागारानं चार पर्यायांच्या छोट्या प्रतिकृतीही सरकारला सादर केल्या आहेत, मात्र त्यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा उभा असलेला देशातील सर्वात मोठ्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराज यांचाही उभा पुतळा बसवण्याचा विचार सध्या सरकार करत आहे. मुंबईमधील अंधेरीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांचा उभा पुतळा आहे. त्याचप्रमाणे शिवस्माराकातील पुतळाही असण्याची शक्यता आहे. सल्लागाराकडून मागवण्यात आलेल्या चार पर्यायापैकी तीन पर्याय हे अश्वारुढ पुतळ्याच्या पायाच्या रचनेत छोटे बदल तर चौथ्या पर्यायामध्ये उभा पुतळा, असं देण्यात आलं आहे. उभा पुतळा करायचं ठरल्यास त्याची उंची 153 मीटर (चबुतऱ्यासह 183 मीटर) करण्याचा विचार आहे. पटेलांच्या पुतळ्याची उंची 152 मीटर (चबुतऱ्यासह 182 मीटर ) आहे. एकूणच सरदार पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा एक मीटर उंच बांधला जाण्याची शक्यता आहे. सध्या प्रस्तावानुसार शिवस्मारकाच्या पुतळ्याची उंची 123.2 मीटर तर चबुतरा 88.8 मीटर आहे (एकूण 212 मीटर). कसं असेल शिवस्मारक?