अलिबाग : सामन्य नागरिकांच्या हिताची आणि अत्यंत महत्त्वाची काम चालणाऱ्या शासकीय कार्यालयात अनेकदा कामाचा ताळमेळ नसल्याच्या घटना समोर येत असतात. पण आता रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालय तर थेट दारूचा अड्डा बनलं आहे. कार्यालयातील शिपाई, कारकून , लिपिक सगळेच मद्यपान करण्यात व्यस्त असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी (25 नोव्हेंबर) सायंकाळी रायगडच्या अलिबाग येथील प्रांत कार्यालयाच्या बंद खोलीत हा सर्व प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.  


असा समोर आला प्रकार


गुरूवारी सायंकाळच्या सुमारास शिवराज्य ब्रिगेडचे सरचिटणीस निलेश पाटील हे कामानिमित्त अलिबाग येथील प्रांत कार्यालयात  गेले होते. यावेळेस, कार्यालयातील एक खोली बंद असल्याचे दिसून आले. यामुळे निलेश पाटील यांना संशय आल्याने त्यांनी संबधित खोलीत
पाहिलं असता कार्यालयातील कारकून, लिपिक, शिपाई आणि इतर काही व्यक्ती हे कार्यालयातील टेबलवर बसून मद्यपान करताना दिसून आले. ज्यानंतर निलेश पाटील यांनी संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करून यासंदर्भात तक्रार देखील केली. पाटील यांनी सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 


कर्मचाऱ्यांकडून दादागिरी


निलेश पाटील हे सर्व प्रकरणाचे चित्रीकरण करत असताना काही कर्मचाऱ्यांनी पाटील यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न देखील केला. त्यांना बाहेर काढण्याचा ही प्रयत्न यावेळी करण्यात आला होता. आता या सर्व प्रकरणाची तपासणी होऊन योग्य कारवाई व्हावी. अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.


इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha