मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पराभूत झालेल्या महाविकास आघाडीने एकीकडे ईव्हीएम विरोधात प्रश्न उपस्थित केला असताना दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी आता ईव्हीएमच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. ईव्हीएमच्या समर्थनार्थ विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि जत विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त गोपीचंद पडळकर यांच्याकडून आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. ईव्हीएम मशीनविरोधात फेक नॅरेटिव्ह तयार करुन जनतेची दिशाभूल करण्याचा मविआचा प्रयत्न असल्याचा त्यांनी आरोप केला. शुक्रवारी सकाळी 11 वाजता हे दोघेही एकदिवसीय आंदोलन करणार आहेत.
महाविकास आघाडीचे आरोप म्हणजे राज्यातील जनतेनं केलेल्या मतदानाचा अपमान असल्याचं गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत म्हणाले. ईव्हीएमच्या समर्थनार्थ मंत्रालयाजवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केलीय.
नाना पटोले आणि जितेंद्र आव्हाडांचा आरोप
विधानसभा निकालानंतर राज्यात ईव्हीएम आणि वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे, विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येतायत. अशातच आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी थेट निवडणूक आयोगावरच निशाणा साधलाय. संध्याकाळी साडेपाचनंतर झालेल्या मतदानाचे फोटो दाखवा? साडेसात टक्क्यांनी मतदान कसं वाढलं? हे वाढलेलं मतदान कोणत्या सेंटरवर झालं? असे अनेक प्रश्न उपस्थित करत पटोलेंनी निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीही निवडणूक आयोग मॅनेज झाल्याचा आरोप केलाय. संध्याकाळी पाच ते सहा या एक तासात 7 टक्क्यांहून अधिक मतदान वाढलं, शेवटच्या एका तासात इतकं मतदान कसं होऊ शकतं, यासंदर्भात निवडणूक आयोगाने बोलावं, अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली.
मनसेचाही ईव्हीएम विरोधात पवित्रा
विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यात आत्मचिंतन बैठक घेतली. सर्व पराभूत उमेदवारांशी चर्चा करून, त्यांची मतं जाणून घेतली. या बैठकीत काही मनसे उमेदवारांकडून ईव्हीएमवरही संशय उपस्थित करण्यात आला. त्यामुळे पुण्यातील बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना ईव्हीएम विरोधातील पुरावे गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
निवडणूक आयोगाचे पुराव्यासह खंडण
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि लगेच मविआ नेत्यांनी ईव्हीएमवर संशय घेत निवडणुक आयोगावर टीका सुरु केली. त्याचवेळी समाजमाध्यमांमध्ये सुद्धा काही व्हिडीओ व्हायरल झाले. मविआ उमेदवारांना त्यांच्या गावातच कमी मतं मिळाली असं सुचवणारे हाताने लिहिलेले काही कागद व्हायरल करण्यात आले. या सगळ्या दिशाभूल आणि खोडसाळ महितीचं निवडणूक आयोगाकडून पुराव्यासह खंडण करण्यात येत आहे. त्यात लक्षणीय होतं धुळ्यातील अवधान गावचा एक व्हिडिओ, तिथे काँग्रेस उमेदवार कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाली असा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात कुणाल पाटलांना 1 हजार 57 मतं पडल्याचं समोर आलं.
सोलापूर-मध्य, माढा, आंबेगाव, कन्नड मतदारसंघाबाबत असेच खोटे मेसेज व्हायरल झाले होते. ते दावे सुद्धा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून पुराव्यासह खोडून काढण्यात आले आहेत. मतदानाच्या टक्केवारीबाबत होत असलेल्या खोडसाळ आरोपांना आज राज्य निवडणूक आयोगाने ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.
ही बातमी वाचा: