धुळे : एसटी महामंडळाच्या १ लाख १० हजार कर्मचाऱ्यांपैकी किमान २० टक्के  कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीमचा लाभ २२ ऑक्टोबर पासून मिळणार आहे . ज्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी अग्रीम साठी अर्ज केले असतील अशा कर्मचाऱ्यांना २२ ऑक्टोबर पासून  दिवाळी निमित्त १० हजार रुपये अग्रीम देण्यात येणार  असल्यानं ज्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी अग्रीम साठी अर्ज केलेले नसतील अशा कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन एसटी प्रशासनाने केलं आहे .


एसटीच्या कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार १० हजार रुपये दिवाळी अग्रीम :-

ज्या एसटी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन  ( बेसिक ) हे २५ हजारापेक्षा कमी आहे असेच कर्मचारी यासाठी पात्र आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन  हे २५ हजारापेक्षा अधिक आहे असे कर्मचारी या साठी पात्र नाहीत. २५ हजारापेक्षा कमी बेसिक असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास २५ हजाराच्या आसपास आहे . तर २५ हजारापेक्षा अधिक मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ७५ हजारापेक्षा अधिक आहे . २५ हजारापेक्षा अधिक मूळ वेतन असलेले कर्मचारी हे सिनिअर मध्ये आहेत .

दरम्यान एसटीच्या सर्वच कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्यात यावा अशी मागणी एसटी कामगार सेनेनं  एसटी प्रशासनाकडे केली आहे . राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१६ पासून वेतनवाढ मंजूर होऊन महागाई भत्ता रक्कम मूळ वेतनात समायोजित केला आहे. मूळ वेतन सण अग्रिमच्या निकषानुसार वाढलेले असल्यानं एसटी महामंडळाने याबाबतीत धोरणात्मक निर्णय न घेतल्यास जवळपास ८० टक्के कर्मचारी वंचित राहणार आहे. राज्य परिवहन महामंडळातील वर्ग - ३  तसेच वर्ग - ४ या सर्व कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम मिळण्यासाठी मूळ वेतनाची मर्यादा वाढविण्याविषयी मागणी केली आहे .

एसटी कामगार संघटना या संघटनेनं एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी अग्रीम मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी २२ आणि २५ ऑक्टोबरला राज्यव्यापी निदर्शन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे . प्रवासी  वाहतुकीला अडथळा न होता, निदर्शनं करणारे कर्मचारी आपल्या सोयी नुसार हे आंदोलन विभागीय कार्यालय, मध्यवर्ती कार्यशाळेसमोर हे आंदोलन करणार असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेनं दिली आहे.