कल्याण : संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये मुंबईपाठोपाठ कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कल्याण डोंबिवलीमधून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरस आल्यापासून गेल्या 9 महिन्यात पहिल्यांदाच आज एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.


कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्यानंतर 11 मार्चला कल्याण डोंबिवलीमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. तर 4 एप्रिल 2020 ला पहिला कोरोना मृत्यू झाला होता. तर जून महिन्यात कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. एकाच दिवसात 600 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण याठिकाणी आढळले होते.


दरम्यान कल्याण डोंबिवलीतील कोरोनाचा मृत्यूदर इतर ठिकाणपेक्षा कमी असला तरी दररोज 1-2 मृत्यूची नोंद होतच होते. मात्र तब्बल 9 महिन्यांनंतर आज म्हणजेच 5 जानेवारी 2021 रोजी एकही कोरोना बाधिता रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या कल्याण डोंबिवलीकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक अशी माहिती आहे.


मार्च महिन्यापासून कल्याण डोंबिवली शहरातील रुग्णाची संख्या 57,910 झाली आहे. तर आजमितीला 55,903 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1010 रुग्णांनी करोनाने जीव गमावला आहे. सध्या 897 रुग्णांवर विविध रुग्णालये आणि विलगीकरण केंद्रात उपचार घेत आहेत.


देशातील कोरोनाची सद्यस्थिती


भारतामध्ये सक्रिय रूग्णसंख्येत सातत्याने घट नोंदविली जात आहे, देशात आज 2,31,036 कोरोनाचे रूग्ण आहेत. हे प्रमाण एकूण रूग्णांच्या 2.23 टक्के आहे. गेल्या 39 दिवसांमध्ये कोरोनामुक्त होणा-यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 29,091जण कोरोनामुक्त झाले आहेत तर भारतामध्ये 16,375 नवीन रूग्ण नोंदवले गेले आहेत. देशात गेल्या 24 तासांमध्ये 8,96,236 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. गेल्या 24 तासात कोरोना रूग्णनोंदीमध्ये 12,917 घट झाल्याचे दिसून आले आहे.


देशात नव्या कोरोना स्ट्रेनचे 58 रुग्ण


यूकेमध्ये पहिल्यांदा सापडलेल्या कोरोनामधील नवीन प्रकारच्या विषाणूची बाधा झालेल्या रूग्णांची भारतातील संख्या आता 58 झाली आहे. पुण्याच्या ‘एनआयव्ही’ संस्थेकडे तपासणीसाठी आलेल्या नमुन्यातील नवीन 20 रूग्णांना या विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.