Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्यात धक्कादायक घटना घडली आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट कोसळल्याने त्यात दबून एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना गोंदियाच्या तिरोड्याच्या लोधीटोला येथील नगरपरिषदद्वारा सुरु असलेल्या पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा इथं घडली आहे. निराली चाफले असं या दुर्घटनेत मृत पावलेल्या 11 वर्षीय विद्यार्थिनीचं नावं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज दुपारी शाळा सुटल्यानंतर घडली. शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घराकडे जाण्यासाठी निघालेले असताना प्रवेशद्वाराचा भला मोठा लोखंडी गेट निरालीच्या अंगावर कोसळल्या यात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने तिरोडा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया इथं नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला. मृत निरालीची आई यात शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. मृत निराली ही इयत्ता पाचवी वर्गात शिक्षण घेत होती. प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.