Pune : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात अवधूत ज्वेलर्समध्ये दोन अज्ञात महिलांनी धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे. 32,000 रुपयांचे सोन्याचे इरिंग (कानातील रिंग)  लंपास केले आहेत. भर दुपारी ही चोरीची घटना घडली आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एका सराफा दुकानात दोन अज्ञात महिलांनी खरेदीच्या बहाण्याने प्रवेश करत 32,000 रुपयांची सोन्याचे कानातील रिंग चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून शिरूर पोलिसांनी अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. फिर्यादी अमोल कचरु दहिवाळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दहीवाळ हे त्यांच्या अवधूत ज्वेलर्स या दुकानात नेहमीप्रमाणे व्यवहार करत होते.  दुपारी साधारण 4.30 ते 4.45 च्या दरम्यान दोन अनोळखी महिला त्यांच्या दुकानात आल्या. सोन्याची कानातील रिंग पाहण्याच्या बहाण्याने त्यांनी दहिवाळ व त्यांच्या भावाकडून वेगवेगळी दागिने दाखवण्याची मागणी केली. दुकानातील गर्दीचा आणि त्यांच्या गाफीलपणाचा फायदा घेत या महिलांनी 4 ग्रॅम 200 मिली वजनाची, सुमारे 32,000 रुपये किमतीची कलकत्ता ए प्रकाराची सोन्याची कानातील रिंग लबाडीने चोरुन नेली.

दरम्यान, या अज्ञात महिलांनी चोरी केलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरी करणाऱ्या महिलांचा तपास करणं सोपं जाणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेत. दरम्यान, राज्याच्या विविध भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी भरदिवसा चोरी होत आहे. यामध्ये अनेक ठिकाणी घरफोडी, दुचाकी चोरी आणि इतर चोरीच्या घटना घडत आहेत, ज्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांनी या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत, पण अजूनही चोऱ्या थांबलेल्या नाहीत. दरम्यान, या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. अशा घटना होऊ नये म्हणून उपापयोजना केल्या जात आहे. रात्रीच्या वेळेस देखील पोलिसांच्या गाड्या फिरत आहे. दरम्यान, अशा चोरीच्या घटनांमध्ये सापडलेल्या चोरांवर मग ती महिला असो की पुरुष त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

दुष्काळात तेरावा... बीडमध्ये आता पाण्याची चोरी, वृद्ध दाम्पत्याच्या विहिरीतील अडीच परस पाणी पळवलं