Coronavirus Impact on Gold Price : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळेच जगभरात अनेक गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणी वाढली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. सोन्याच्या किंमती वाढत आहेत. जळगावच्या सुवर्ण नगरी मध्ये करासह पन्नास हजारांचा टप्पा सोन्याने गाठला असल्याचं पाहायला मिळाले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्येही जगभरात सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली होती. सोन्याच्या मागणी आणि किंमतही वाढली होती. त्यावेळी सोन्याची किंमत प्रतितोळा 56000 रुपये इतकी झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात कमी होत असल्याचं दिसून येताच सोन्याच्या मागणीतही घट झाली होती. अन् त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाल्याच दिसून आले होते.
मागील काही आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याच दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सोने चांदीचे दर वधारले आहेत. जळगावमधील सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात चोवीस तासात सातशे ते आठशे रुपयांनी वाढ झाली आहे. जीएसटी करासह हेच दर पन्नास हजार सहाशे इतके झाले आहेत. तर चांदीच्या दरात ही एकच दिवसात तीन हजार रुपयांची वाढ झाल्याने 63000 हुन ते 67000 हजार रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहेत. आगामी काळात ही सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता सोने व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
सोन्याच्या दरात कमी अधिक भाव हे नेहमीच होत असतात, मात्र सोने खरेदी करतांना आम्ही सोन्याच्या भाव कडे कधी बघत नाही, कारण भाव काहीही असले तरी सोन्या मधील गुंतवणूक ही नेहमी फायदेशीर असते. शेवटी हौसेला मोल नसते म्हणून भाव काहीही असले तरी आपण सोने खरेदी करताना त्याचा विचार करत नसल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत.