मुंबई : सुरेश प्रभू यांचं रेल्वे मंत्रालय प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि कौतुकांच्या ट्वीट्सची कायमच तातडीने दखल घेताना दिसतं. नाशकात येवला स्थानकावर टॉयलेटमधून पडलेली प्रवाशाची सोनसाखळी ट्वीटवरुन मदतीची मागणी केल्यानंतर परत मिळाली.
डॉ. चव्हाण-पाटील 16 जुलै रोजी महाराष्ट्र एक्स्प्रेसने लोणंदहून मनमाडला चालले होते. गाडी येवले स्थानकावर आली असताना डॉ. पाटील शर्ट बदलण्यासाठी टॉयलेटमध्ये गेले. शर्ट काढताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन निघाली आणि शौचालयातून खाली पडली.
50 ग्रॅम वजनाची अंदाजे दीड लाख रुपयांची चेन गेल्याने डॉ. पाटील यांनी तातडीने ट्रेनची साखळी ओढली. साखळी कोणी ओढली हे शोधत ट्रेनचा गार्ड येताच डॉक्टरांनी कारण सांगितलं. याबाबत येवल्याचे स्टेशन मास्तर शर्मा यांना सांगण्यात आलं.
गाडीला बायो टॉयलेट असल्यामुळे ट्रेन कोल्हापूरला गेल्यावर सफाई कर्मचारी त्या बायो टॉयलेटची टाकी सफाईसाठी उघडतील. त्यामुळे कोल्हापूरला गेल्यावर चेन शोधता येईल, अशी माहिती त्यांना देण्यात आली.
डॉ. पाटील यांनी सोन्याच्या चेनचा नाद सोडला आणि ते येवल्याहून सहा तासांचा प्रवास करुन फलटणला घरी परतले. मात्र त्यांच्या मुलीने 18 जुलै रोजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना ट्वीट केलं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत रेल्वेमंत्र्यांनी उत्तर देत संबंधित कर्मचाऱ्यांना शोध घेण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं.
अर्ध्या तासानंतर डॉ. पाटील यांना पुणे रेल्वे स्टेशन मास्तरांचा फोन आला आणि त्यांनी चेन कुठे, कशी पडली याची माहिती घेतली. त्या गाडीला बायो टॉयलेट नव्हतं, तर साधं भारतीय पद्धतीचं शौचालय होतं, अशी माहिती मिळाली. म्हणजे पडलेली चेन त्या शौचालयाच्या आरपार खाली जाऊन रुळांमध्ये पडली असणार, ही माहिती येवले येथे स्टेशन मास्तर शर्मा यांना कळवण्यात आली.
शर्मा यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने भर पावसात सुमारे दोन किमी अंतराच्या रेल्वेरुळांमध्ये कसून शोध घेतला. अखेर रुळांमधील खडीतील घाणीतून चेनचा शोध घेण्यात यश आलं. डॉ. पाटील यांना सोनसाखळी मिळाल्याचं समजताच त्यांच्याही जीवात जीव आला.
रेल्वेमंत्र्यांचा ट्वीट आणि टॉयलेटमधून पडलेल्या सोनसाखळीचा शोध
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jul 2017 01:22 PM (IST)
डॉ. पाटील शर्ट बदलण्यासाठी टॉयलेटमध्ये गेले. शर्ट काढताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन निघाली आणि शौचालयातून खाली पडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -