बार्शी : जागतिक पातळीवरील ग्लोबल टीचर अवार्ड प्राप्त केलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींनी कोरोनावर मात केलीय. युनेस्को आणि वार्की फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईज जाहिर झाल्यानंतर डिसलेंवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी त्यांची भेट देखील घेतली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज ठाकरे इत्यादी मंडळींनी मुंबईत डिसले गुरुजींचा सन्मान केला.


अनेकांतर्फे केला गेलेला सन्मान स्वीकारुन रणजितसिंह डिसले जेव्हा बार्शीत परतले तेव्हा त्यांना काहीसा ताप जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि त्यानंतर आईला देखील कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांनी बार्शीतील डॉ. संजय अंधारे यांच्याकडे उपचार घेण्यास सुरुवात केली. जवळपास 10 दिवस उपचार घेतल्यानंतर रणजितसिंह डिसले यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि आई यांनी देखील कोरोनावर मात केल्याने त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.


रणजितसिंह डिसले यांनी स्वत: समाजमाध्यमांमध्ये पोस्ट करत ही माहिती दिली. डिसले यांना डिस्चार्ज दिल्यानंतर हॉस्पीटलतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डिसले यांनी डॉ. अंधारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. मागील 10 दिवस डॉ. संजय अंधारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे मी आज कोरोनामुक्त झालो, याचा आनंद आहे. सुश्रूत हॉस्पीटलमधील देवदुतांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी दिलेल्या सदिच्छा, प्रेम आणि डॉक्टरांच्या उपचारामुळे ही लढाई जिंकली. अशा शब्दात ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजितसिंह डिसले यांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. तसेच लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घेण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.


रणजितसिंह डिसले यांची फेसबुक पोस्ट






#देवदूत
ग्लोबल टीचर प्राईझ मिळाल्याचा आनंद साजरा करीत असतानाच कोरोनाग्रस्त झालो। मात्र योग्य वेळी निदान झाल्याने उपचार लवकर सुरू झाले आणि परिस्थिती लवकरच आटोक्यात आली .
बार्शीचे सुप्रसिद्ध डॉक्टर संजय अंधारे सर आणि सुश्रुत हॉस्पिटलचे सर्व देवदूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेऊन कोरोनावर मात केली, याचा आनंद आहे।
मागील 10 दिवस अंधारे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेले परिश्रम यामुळे आज मी कोरोनामुक्त झालो आहे, याचा आनंद आहे।
अर्थात लढाई अजून संपलेली नाहीये. आपण सर्वांनी दिलेल्या सदिच्छा, प्रेम आणि डॉक्टर संजय अंधारे सरांनी केलेले उपचार यामुळे अर्धी लढाई जिंकली आहे .
सुश्रुत हॉस्पिटल च्या सर्वच देवदूतांचे मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. आणि सर्वांना एकच आवाहन करतो, की लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांशी संपर्क साधा, लगेच टेस्ट करून घ्या। लवकर निदान आणि वेळेवर उपचार हीच कोरोनावर मात करण्याची युक्ती आहे।