पंढरपूर : मोहोळ येथील एसटी महामंडळाच्या विठाई बसवरील विठुरायाचे दर्शन घेतानाचा महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मंदिर समितीने त्या महिलेचा शोध घेतला. तिला थेट विठुरायाच्या मंदिरात नेऊन दर्शन घडवले. अगदी तिला रुक्मिणी मातेची साडीचोळी देखील दिली. सईबाई बंडगर या मोहोळ येथील विठ्ठलभक्त असून दर महिन्याच्या एकादशीला त्या पंढरपूरमध्ये येत असतात. मात्र अशिक्षित असल्याने ऑनलाईन पास काय असतो तेच माहित नसल्याने त्यांनी एसटीच्या विठाई बसवरील विठ्ठलाच्या चित्राला पंढरपूरचा विठ्ठल मानून नमस्कार केला. ही क्लिप सोशल मीडियावर आल्यावर वारकरी संप्रदायाचे रामकृष्ण महाराज वीर यांनी या महिलेला मंदिरात घेऊन गेल्यावर समितीने तिचे थेट दर्शन घडविले.
मंदिर सुरु झाल्यापासून ऑनलाईन बुकिंग नसलेल्या शेकडो सईबाई रोज विठुरायाच्या दर्शनाची आस ठेवून येतात आणि बाहेरून नामदेव पायरीच्या पाया पडून परत फिरतात. अशिक्षित असल्याने अशा अनेक मायमाऊलीन ऑनलाईन बुकिंग काय असते हेच माहित नाही. दुर्दैवाने मंदिर समितीने अशा गोरगरीब विठ्ठल भक्तांचा विचारच न केल्याने अशा शेकडो सईबाईंना रोज विठ्ठलाच्या दर्शनासाठी झगडावे लागते आणि अखेर विना दर्शनाचे परत जावे लागते.
शासनाने दिवाळी पाडव्याला राज्यातील मंदिर उघडल्यानंतर मंदिर समितीने ऑनलाईन दर्शनाचा पर्याय स्वीकारला आणि रोज 1 हजार भाविकांपासून सुरु झालेली ही सुविधा आता 4800 भाविकांच्यापर्यंत पोहोचली आहे. खरा प्रश्न असतो ते ऑनलाईन बुकिंग करूनही 25 ते 30 टक्के भाविक दर्शनाला येत नसल्याने रांग मोकळी पडते पण दर्शनाची आस घेऊन शेकडो मैलांवरून आलेल्या आणि ऑनलाईन व्यवस्थेची माहिती नसणाऱ्या भक्तांना विठ्ठलाचे दर्शनाविनाच परत फिरावे लागते आहे.
मोहोळ येथील सईबाईने एसटी बसवरील चित्रात विठ्ठल पहिला तसे रोज येणाऱ्या शेकडो सईबाई नामदेव पायरीला उभारून कलशात देवाचे दर्शन घेत आहेत. कोरोनाचा नियम पळून या भाविकांना थेट पसाशिवाय मोकळ्या रांगेत दर्शनाला सोडले तर याही भोळ्या भाबड्या शेकडो सईबाईंना त्यांच्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन मिळणे शक्य होणार आहे. मंदिर समितीने पूर्वी तिरुपतीच्या धर्तीवर टाइम टोकन दर्शन व्यवस्थेची घोषणा करून जवळपास 10 ते 15 लाख टोकन छापून घेतले आहेत . आता या कोरोनाच्या काळात थेट दर्शनासाठी येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना ही टोकन देऊन कोरोनाचे नियम पाळत मंदिरात सोडले तर अशा शेकडो विठ्ठलभक्त सईबाईंना त्यांच्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेता येईल.