Girish Mahajan : राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पाऊस पडलेला आहे. शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालं आहे. काल रात्रीपासून व आजही अनेक ठिकाणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली आहे. मुख्यमंत्री याबाबत योग्य ते निर्णय घेतील असेही ते म्हणाले. 

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आहे. याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पाहण्याचा आमचा दृष्टीकोन हा सकारात्मक असल्याची माहिती महाजन यांनी दिली. शेतकऱ्यांना अधिकाधिक चांगली मदत ही केली जाणार असल्याचे महाजन म्हणाले.

आम्ही महायुतीमध्ये लढू अशी तिन्ही नेत्यांनी चर्चा केलीय

पंजाबमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळाली याबाबत कल्पना नाही मात्र त्याबाबत माहिती घेणार असल्याचे महाजन म्हणाले.  मात्र सरकार शेतकऱ्यांबाबत सकारात्मक आहे, शेतकरी मेटाकुटिला आलेला आहे असे महाजन म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कोणाची वेगळी चूल आणि कोण एकत्र स्वयंपाक करणार याबाबत मला माहिती नाही. मात्र असं कुठेही ठरलेलं नाही आम्ही महायुतीमध्ये लढू अशी तिन्ही नेत्यांनी चर्चा केलेली आहे  असे महाजन म्हणाले. फार अपवादात्मक काही ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी मात्र विचार केला जाईल मात्र आमची भूमिका ही महायुतीमध्ये लढण्याची असल्याचे महाजन म्हणाले.  

प्रांजल खेवलकर यांचे पराक्रम न्यायालयाने दाखवले 

एकनाथ खडसे हे धन्य त्यांचं जेवढं कौतुक करावं ते कमी आहे असा टोला महाजन यांनी लगावला. प्रांजल खेवलकर यांचे पराक्रम न्यायालयाने दाखवले आहेत, मात्र आता त्यांच्या सासरेबॉ यांना काय बोलावं हे कळत नाही.  पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना रेड हॅन्ड पकडले आहे. त्यांचे सर्व पराक्रम हे कोर्टात सांगितलेले आहे. ते डॉक्युमेंट आता सर्वांसमोर पब्लिकमध्ये आणायचे का? असा सवाल महाजन यांनी केला. हा सर्व न्यायप्रविष्ट विषय आहे.

संजय राऊतांना काहीही काम नाही, म्हणून त अवास्तव बोलतात

संजय राऊत यांना सकाळपासून काहीही काम नाही त्यामुळे ते काहीतरी अवास्तव बोलत राहतात. संजय राऊत यांच्याकडे कोणी आता बघत नाही आणि त्यांना कोणी सिरियसली घेत नाही  असे महाजन म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती केली मात्र त्यांना आता बरोबर हे सर्व नाटक जमतील असे महाजन म्हणाले.  अडीच वर्षे आपण काय काय पराक्रम केले हे लोकांना माहिती आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला त्यावेळेस चिखलामध्ये पाय भरवायला नको, बूट ओले व्हायला नको रेड कार्पेट टाकण्यात आले ते आता सर्व समोर दिसत आहे असे महजान म्हणाले.  कोरोना काळात मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. गुंडांच्या बॅगमध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला हे सर्व लोकांसमोर आहे. आपण सत्तेत असताना कसं वागलो काय केलं लोक मरत असताना घराबाहेर कधी पडले नाही आता मात्र उद्धव ठाकरेंना कसं काय पुतना मावशीचे प्रेम आहे. आता हात जोडले उद्यापासून पाया पडतील. हे सर्व त्यांचे नाटक सुरू आहेत असे महाजन म्हणाले.