Gingee Fort: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे किल्लेवैभव असलेले 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत (UNESCO World Heritage List) समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्याचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील एक जिंजी (Gingee Fort) या किल्ल्यांचा समावेश आहे.
जिंजीचा किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक किल्ला आहे. ह्या किल्ल्याला राजगड आणि रायगडनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखतात. "दक्षिणेचा ट्रॉय" म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना महाराजांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला. पूर्वी असलेला किल्ला पाडून नव्याने महाराजांनी हा किल्ला बांधून घेतला.
राजाराम महाराजांनी 8 वर्षे जिंजीवरुन राज्यकारभार पाहिला-
मराठ्यांच्या इतिहासात दुर्गराज रायगडला जितकं महत्व आहे तितकंच महत्व जिंजीच्या किल्ल्याला सुध्दा आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. छत्रपती संभाजी महाराजांना फंदफितूरीने पकडून छळ करुन मारण्यात आले. त्यावेळी स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले आणि तिथून राज्यकारभार पाहू लागले. राजाराम महाराजांनी 8 वर्षे या गडावरुन राज्यकारभार पाहीला.यामुळे औरंगजेबाला आपले निम्मे सैन्य दक्षिणेकडे पाठवावे लागले. परिणामी स्वराज्यावरील मुघल सैन्याचा दबाव कमी झाला व मराठ्यांनी गेलेले किल्ले व प्रदेश पुन्हा जिंकून घेतले.
वास्तूशास्त्र व युध्दशास्त्राच्या दृष्टीने जिंजी हा उत्कृष्ट किल्ला-
जिंजीसारखा अभेद्य किल्ला पाहताना महाराजांच्या दूरदृष्टीची जाणीव पदोपदी होत होती. पूर्वी या ठिकाणी कृष्णगिरी, राजगिरी, चंद्रयान दुर्ग (चंद्रगिरी) हे वेगवेगळे तीन किल्ले होते. तिथे संरक्षणाच्या दृष्टीने तटबंदी बांधून तिघांचा मिळून एक किल्ला शिवाजी महाराजांनी केला. जिंजी किल्ल्याचे दुर्गमत्त्व त्याच्या नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती वरुन कळतेच पण त्याच बरोबर उपलब्ध परिस्थितीचा पुरेपूर विचार करण्यात आला आहे. लष्करी वास्तुशास्त्रीय बाबींचा सखोल विचार करून तटबंदीची शृंखला, निर्माण केली. आजही साधारणतः 11 किलोमीटर लांबीची तटबंदी आपल्याला पहायला मिळते. तसेच टेहाळणी बुरुज, खंदक, राहण्याच्या जागा, पावसाच्या पाण्याचे नियोजनासाठीचे तलाव व टाके, पाण्याच्या टाक्यांचा संरक्षणदृष्टया वापर अतिशय खुबीने केलेला आहे. यामुळे हा किल्ला अधिकच अभेद्य बनला. वास्तूशास्त्र व युध्दशास्त्राच्या दृष्टीने जिंजी हा उत्कृष्ट असा किल्ला आहे.