नाशिक : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.


अशी घडली घटना
दुपारी 12 वाजता टॅंकर ऑक्सिजन भरण्यासाठी दाखल झाला. आज टॅंकर आला तेव्हा लीक होत असल्याचं निदर्शनास आले. बारीक छिद्र होते त्यातून ऑक्सिजन लीक होत होता. आंतरराष्ट्रीय कंपनी 'टाय यो निपोन' यांच्या माध्यमातून ऑक्सिजन टाकी उभारण्यात आली आहे.


देखभाल करण्याची जबाबदारी कंपनीची आहे.  कंपनीला ही माहिती कळवीत असतानाच छिद्र मोठे झाले आणि गॅस गळती वाढली. त्यानंतर मनपाच्या अग्निशमन दलाला आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं.


दरम्यान ज्या पाईपच्या माध्यमातून गॅस पुरवठा केला जातो तो पाईप बदलण्यात आला,  यात साधारण एक ते दीड तास लागला. या दरम्यान 22 रुग्णांचे प्राण गेले.  


यानंतर शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, खासदार हेमंत गोडसे, मनपा आयुक्त कैलास जाधव, महापौर सतीश कुलकर्णी ,पालकमंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 


या टाकीत लिक्विड मेडिकल ऑक्सिजन होता. मायनस 160  डिग्री तापमानात हा साठवला जातो. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. घटना घडली तेव्हा 25 ते 30 टक्के ऑक्सिजन साठा होता.  


Nashik Oxygen Leak : नाशिक ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची माहिती


मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर
या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे.


Nashik Oxygen Leak : मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर, ' महाराष्ट्र शोकमग्न आहे' म्हणत मुख्यमंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश


कोरोनाच्या या लाटेत ऑक्सिजनचे किती महत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. प्राणवायूच्या प्रत्येक कणासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करतोय. ऑक्सिजनची गळती कोणत्याही परिस्थितीत होऊ नये म्हणून आपण प्रत्येक बैठकांत सुचना दिल्या आहेत असे असताना हे कसे घडले  ते तातडीने तपासून जबाबदारी निश्चित करावी असे आपण मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणतात. यापुढे प्रत्येक रुग्णालयांच्या ठिकाणी प्राणवायूच्या साठ्याची काळजी घेऊन त्याच्या सुयोग्य उपयोग व्हावा तसेच रुग्णांना प्राणवायू मिळण्यातल्या अडचणी तत्काळ दूर झाल्याच पाहिजेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


महाराष्ट्र शोकमग्न आहे! -मुख्यमंत्री  


मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!”  अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.