Ganeshtosav 2022 : कोरोना महासाथीचा जोर ओसरल्याने यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दोन वर्षानंतर गणेशोत्सवासाठी अनेकांचा ओढा गावाकडे असल्याचे दिसून येत आहे. मात्र, गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या सामन्यांची खासगी ट्रॅव्हल चालकांकडून (Private Travel Bus Operator) लूट होत असल्याची बाब समोर आले आहे. जादा बस असल्या तरी गणेशोत्सवानिमित्ताने अधिक भाडे वसूल (Hike in Bus ticket Price) केले जात असल्याची कबुली एका खासगी ट्रॅव्हल चालकाने 'एबीपी माझा'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिली आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दर निश्चितीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 


कोकणात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवानिमित्त एसटीने जादा बसेस सोडल्या आहेत. त्याशिवाय, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेनेही अतिरिक्त एक्स्प्रेस चालवल्या आहेत. कोकणावासियांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, एसटी आणि रेल्वेत आरक्षण न मिळाल्याने अनेकांकडून खासगी वाहतुकीचा पर्याय अवलंबला जातो. प्रवाशांची असलेली गरज पाहता खासगी बस चालकांकडून मोठ्या प्रमाणावर तिकीट दर वाढवले जात आहेत. विशेष म्हणजे अधिक बस असल्याने आसने रिक्त आहेत. मात्र, सणानिमित्ताने दरवाढ करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. 


तिकीट दर किती?


यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सने आपले तिकीट दर दुप्पट केले आहेत. बसचे भाडे तपासण्यासाठी 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधीने चेंबूर येथील डायमंड गार्डन, सायन आणि दादरजवळील काही ट्रॅव्हल्सच्या दुकानांना भेट दिली आणि कोंकणला जाण्यासाठी बसचे दर बदल माहिती घेतली.


 माझाच्या प्रतिनिधीने नॅशनल ट्रॅव्हल्सकडे राजापूरकडे जाण्यासाठीच्या दराची चौकशी केली. नॉन-एसीसाठी 1300 रुपये आणि एसी सीटिंगसाठी सुमारे 2100 रुपये दर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात खासगी ट्रॅव्हल्सकडे हे दर असले तरी ऑनलाइन बुकिंग अॅप्सवरही हे दर अधिक असल्याचे एका ट्रॅव्हल एजंटने सांगितले. 


दुसर्‍या ट्रॅव्हल्सकडेही असेच दर असल्याचे आढळून आले. फक्त गणपतीचा सण आहे म्हणून दर अधिक असल्याचे एका ट्रॅव्हल एजंटने म्हटले. गणेशोत्सवाचा सण संपल्यानंतर दर सामान्य केले जातील.  जादा बसेस धावत असल्याने जागा उपलब्ध आहेत परंतु गणपती हा सण असल्याने दर जास्त त्यांनी सांगितले. कोकणात जाणाऱ्या बसचे दर आणखी चार-दिवसांनी कमी होतील असेही या एजंटने सांगितले. 


पाहा व्हिडिओ: Sting Operation : गणपतीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची लूट, एबीपी माझाकडून पर्दाफाश