गडचिरोली: वर्दीतल्या माणसाने खाकीपलिकडे जाऊन दाखवलेली माणुसकी आपण अनेकवेळा पाहिली आहे. पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती गडचिरोलीत आली आहे.
रुग्णालयात रक्ताची आवश्यकता भासल्यामुळे, चक्क गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह शंभरहून अधिक पोलिसांनी रक्तदान केलं.
या प्रकारामुळे समाजहितासाठी सातत्याने 'अभिनव' उपक्रम राबवणाऱ्या देशमुख साहेबांना प्रत्येक गडचिरोलीकर एक-एक कडक सॅल्युट ठोकत आहेत.
काय आहे प्रकरण?
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात.
या रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताची आवश्यकता पडते. त्यासाठी काही सामाजिक संघटना किंवा स्वयंस्फूर्त रक्तदात्याकडून जमा करण्यात आलेले रक्त, रुग्णांना दिले जाते. मात्र यावर्षी रक्तदात्याचे प्रमाण घटल्याने गडचिरोलीत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी भटकावे लागत आहे.
ही बाब गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांना कळताच, पोलीस मुख्यालयातील रुग्णालयात रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबिरात स्वतः पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस अधिकारी आणि शेकडो पोलीस कर्माचाऱ्यांनी रक्तदान करुन, सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णांना देण्यात आले.
गडचिरोली जिल्हा नक्षलदृष्टया संवेदनशील आहे. इथे नक्षल हल्ल्यातील जखमी जवानांसोबतच, सामान्य रुग्ण, गरोदर माता आणि अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता पडते.
जिल्ह्यात अहेरी उपजिल्हा रुग्णालय आणि गडचिरोलीचे सामान्य रुग्णालय या दोनच ठिकाणी ब्लड बँक आहे. मागील वर्षी काही सामाजिक संघटना आणि इतर रक्तदात्यांकडून 6767 बॅग रक्त जमा करण्यात आले होते. त्यापैकी 6000 गरजू रुग्णांना रक्त देण्यात आले.
मात्र यावर्षी रक्तदात्यांकडून कमी प्रमाणात रक्त जमा झाले होते. त्यामुळे अहेरी आणि गडचिरोलीच्या रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता.
याबाबत गंभीर दखल घेत पोलीस विभागाने स्वत:च रक्तदान शिबीर घेऊन, रक्ताचा तुटवडा दूर करण्यास मदत केली.
विशेष म्हणजे यावेळी 2015 साली नक्षल हल्ल्यात जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक तेजस मोहिते यांनीही रक्तदान केलं.
या उपक्रमामुळे पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या टीमचं गडचिरोलीत कौतुक होत आहे.