Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील विसोरा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर आणि परिचारिकेच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे आदिवासी समाजातील एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागल्याची संतापजनक घटना घडली आहे. मनिषा शत्रुघ्न धुर्वे (वय 31, रा. विसोरा) असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या पोटात असलेल्या बाळाचाही मृत्यू झाला आहे. ही घटना 13 एप्रिल रोजी घडली.

मनिषाचे हे पहिलेच बाळंतपण होते. तिला प्रसूतीसाठी विसोरा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. बराच वेळ उलटूनही प्रसूती न झाल्याने कुटुंबीयांनी रुग्णवाहिका मागवून तिला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथील डॉक्टर गणेश मुंडले आणि परिचारिका उके यांनी 'थोडा वेळ थांबा, इथेच प्रसूती होईल' असे सांगून रुग्णवाहिका परत पाठवली. 12 तास उलटूनही प्रसूती झज्ञली नाही. अखेर कुटुंबियांनी देसाईगंज येथीलच ग्रामीण रुग्णालयात मनिषाला हलवले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे. देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयासमोर उबाठा गटाच्या सुरेंद्र चंदेल यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले आहे. सध्या या घटनेमुळे परिसरात तणाव आहे. (Gadchiroli news)

 नक्की घडले काय?

विसोरा येथील मनिषा धुर्वे हिची पहिलीच प्रसूती होती. त्यासाठी तिला 13एप्रिलला गावातीलच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात भरती करण्यात आले. तपासणी केल्यानंतर बराच वेळ होऊनही मनिषाची प्रसूती झाली नाही. त्यामुळे मनिषाच्या कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावून तिला देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र, विसोरा येथील उपकेंद्रातील डॉक्टर गणेश मुंडले आणि परिचारिका उके यांनी 'आणखी थोडा वेळ थांबा, मनिषाची प्रसूती येथेच होईल', असे तिच्या कुटुंबीयांना सांगून रुग्णवाहिका परत पाठवली. परंतु तब्बल 12 तास उलटूनही मनिषा प्रसूत झाली नाही. शेवटी तिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनीही प्रसूती होईल, असे सांगितले. परंतु प्रसूती न झाल्याने मनिषाच्या कुटुंबीयांना 14 एप्रिलच्या संध्याकाळी तिला ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी मनिषाला मृत घोषित केले. तिच्या बाळाचाही पोटातच मृत्यू झाला. त्यानंतर आज देसाईगंज येथे मनिषाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु झाली. 

आज देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. दोषी डॉक्टर आणि परिचारिकेला निलंबित करेपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही, असा पवित्रा घेतल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.या प्रकारामुळे प्राथमिक आरोग्य सेवांवरील विश्वासाला तडा गेला असून, प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: