Gadchiroli Naxalites News : एटापल्ली तालुक्यातील जांभिया गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील मोडस्को जंगलात आज पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. सायंकाळी ठार झालेल्या दोन्ही महिला नक्षलींची ओळख पटली असून दोघींवर शासनाचे तब्बल 14 लाख रुपयांचे बक्षीस होते, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.
सुमित्रा ऊर्फ सुनिता वेलादी, वय 38 वर्षे, रा. मडवेली ता. अहेरी, जि. गडचिरोली ही गट्टा दलम कमांडर असून आणि ललीता ऊर्फ लड्डो ऊर्फ संध्या कोरसा, वय 34 वर्षे, रा. नेलटोला, ता. पाखांजूर, जि. कांकेर (छ.ग.) ही गट्टा दलमची एसीएम होती. सुमित्रावर चकमक – 14, खून – 12, जाळपोळ – 03 आणि इतर – 02 असे 31 गुन्हे तर ललितावर चकमक – 08, खून – 04, जाळपोळ – 01, इतर – 01 असे 14 गुन्हे दाखल होते. त्यामुळे सुमित्रावर 8 तर ललितावर 6 लाख रुपयांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. घटनास्थळावरून 47 रायफल, पिस्तूल, 1, जिवंत काडतूस 37, वॉकी टॉकी 2 जप्त करण्यात आले. 2021 पासून गडचिरोली पोलीसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 93 कट्टर नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, 130 जणांना अटक तर 75 नक्षलवाद्यांनी पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
गेल्या महिन्यात देखील चार नक्षलवाद्यांचा खात्मा
गेल्या महिन्यात देखील गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalites) चकमक झाली होती. सुमारे आठ तास चाललेल्या या चकमकीनंतर चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना (Police) यश आलं होतं. भामरागड तालुक्यात मुसळधार पावसाच गडचिरोली पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली होती. गडचिरोली-नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 आणि इतर नक्षलवादी दबा धरून बसले असल्याच्या गोपनीय माहितीवरून अप्पर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली C-60 ची 19 पथके आणि CRPF QAT ची 02 पथके सदर जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती. सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर या परिसरात शोध घेतला असता 04 जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले असून एक पुरुष आणि तीन महिला नक्षलचा समावेश होता. याशिवाय घटनास्थळावरून एक SLR रायफल, 02 INSAS रायफल जप्त करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या: