Gadchiroli News : गडचिरोलीत मोह फुलापासून मद्यनिर्मिती प्रकल्पाचा वाद; जनसुनावणीसाठीची नोटीस जाहीर होताच विरोधाचे स्वर बुलंद, डॉ. अभय बंग म्हणाले...
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात एलटीबी बेव्हरेजेस (LTB Beverages) या मोह फुलापासून दारू ( इथेनॉल ) बनवण्याच्या प्रस्तावित कारखान्यासंदर्भात पुन्हा एकदा जोरदार विरोध सुरू झाला आहे.

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यात एलटीबी बेव्हरेजेस (LTB Beverages) या मोह फुलापासून दारू ( इथेनॉल ) बनवण्याच्या प्रस्तावित कारखान्यासंदर्भात पुन्हा एकदा जोरदार विरोध सुरू झाला आहे. गडचिरोली एमआयडीसीमध्ये एलटीबी बेव्हरेजेसचा मोह फूलापासून इथेनॉल निर्मितीचा कारखाना प्रस्तावित असून त्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाने 9 मार्चला जनसुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र वर्तमानपत्रात त्या संदर्भातली जनसुनावणीची नोटीस जाहीर झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर या प्रस्तावित कारखान्याला विरोध सुरू झाला आहे.अशातच, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग (Dr. Abhay Bang) यांनी प्रस्तावित दारू निर्मिती कारखाना कायदेविरोधी, आदिवासी विरोधी आणि जनता विरोधी असल्याचे म्हणत त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
Gadchiroli News : जन सुनावणीसाठीची नोटीस जाहीर होताच विरोधाचे स्वर बुलंद
विशेष म्हणजे 2024 मध्ये ही या कारखान्याचे गुपचूप भूमिपूजन झाल्याचे समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी अभियान राबवत 83 हजार सामान्य नागरिकांच्या दारू कारखाना विरोधात स्वाक्षऱ्या गोळा करण्यात आल्या होत्या, अनेक ग्रामपंचायतीमध्ये कारखान्या विरोधात ठराव पारित केले होते. त्यानंतर शासनाने गडचिरोलीत दारू निर्मितीचा कारखाना होणार नाही, असे जाहीर केल्याने विरोध शमला होता. मात्र आता पुन्हा जन सुनावणीसाठीची नोटीस जाहीर होताच विरोधाचे स्वर बुलंद होऊ लागले आहे. डॉ अभय बंग सारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याने आंदोलनात्मक भूमिका घेतल्यामुळे हे प्रकरण चांगलेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले डॉ अभय बंग? (Dr. Abhay Bang on LTB Beverages )
-दारुमुळेच आदिवासींचे सर्वाधिक नुकसान होते, त्यामुळे आदिवासी भागात दारू विक्री नको, अशी आधीच सरकारची पॉलिसी आहे. असे असताना आदिवासी बहुल जिल्ह्यात दारू निर्मितीच्या कारखाना कशाला?
-एक वर्षांपूर्वी जेव्हा या कारखान्याच गुपचूप भूमिपूजन झालं, तेव्हा लोकांनी विरोध केला. गावोगावी ग्रामसभांनी विरोध केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखाना होणार नाही अशी घोषणा केली. आता पुन्हा तोच कारखाना कसं काय डोकं वर काढू शकतो?
- त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जात आहे, की गुपचूप नियोजनबद्ध पद्धतीने गडचिरोलीच्या माथी दारू कारखाना मारला जातो आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सामान्य जनतेचा विरोध झुगारून दारू कारखाना झाला, तर ती दारू जिल्हाभर पसरेल आणि आदिवासींचा, महिलांचा नुकसान होईल.
-आधीच गडचिरोली जिल्ह्यात 700 गावात महिलांनी त्यांच्या ताकदीवर अवैध दारू बंद केली आहे. असे महाराष्ट्रात कुठेही नाही, त्यामुळे.अशा जिल्ह्यात दारू कारखाना का करता??
-मोह फुलापासून दारू ऐवजी इतर खाद्यपदार्थ का बनवत नाही? लहान मुलांसाठी चॉकलेट का बनवत नाही? त्याद्वारे मोह फुलाला दरही मिळेल, लहान मुलांना पोषण ही मिळेल. मोह फुलापासून दारू बनवून कोणाला लाभ कमवायचा आहे? हे शोधले पाहिजे..
-मोह फुलांपासून दारू निर्मितीचा कारखाना गडचिरोलीत निर्माण झाल्यानंतर ती दारू मॅरीन ड्राईव्हच्या श्रीमंत व्यक्तीला पाजली जाणार नाही, तर गडचिरोली जिल्ह्यातील गरीब आदिवासींनाच पाजली जाईल.
-गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चोरटी दारू तस्करीच्या माध्यमातून आणली जाते. चंद्रपूरची दारूबंदी उठल्यानंतर खूप मोठे विपरीत परिणाम गडचिरोलीवर होत आहे. अशात आणखी एक दारू कारखाना इथे आणून दारूचे महापूर वाहू नका.
-मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे, त्यांनी ही जन सुनावणी रद्द करावी, अशी आमची मागणी आहे.
























